
>> स्पायडरमॅन
जादू, तंत्र-मंत्र, हडळी, भुते हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. अमका तमका तंत्र-मंत्र शिकायला लहानपणी घर सोडून कसा गेला होता किंवा एखादी स्त्राr जादूटोणा कसा करते, एखादी जागा कशी पछाडलेली आहे याच्या सुरस कहाण्या जगाच्या कानाकोपऱयात ऐकायला मिळतात. या विषयाची आवड असलेला संपूर्ण जगात एक मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यातील बहुतांश लोकांचे यासंदर्भातील ज्ञान हे कथा, कादंबऱया, चित्रपट, ऐकलेले अनुभव यावर आधारलेले असते. मात्र आता मंत्र-तंत्र विद्येचा यथासांग आणि परिपूर्ण असा अभ्यास करण्याची संधी एक ब्रिटिश युनिव्हर्सिटी घेऊन आलेली आहे. तेव्हा हॅरी पॉटर, हर्माइनी बनायला तयार व्हा. ब्रिटनमधील नावाजलेली एक्सेटर युनिव्हर्सिटी मंत्र-तंत्र विद्येशी संबंधित अभ्यासक्रम घेऊन आली आहे. दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला पीजीची डिग्रीदेखील प्रदान करण्यात येणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होणाऱया या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश जागतिक स्तरावर जादूटोण्याचा असलेला ऐतिहासिक आणि सामाजिक प्रभाव तपासणे आणि अभ्यासणे हा असेल. त्याच जोडीला विद्यार्थ्यांना हडळी, ड्रगन, तंत्र-मंत्र इत्यादीसंदर्भातदेखील शिक्षण देण्यात येईल. मध्यकालीन युगात स्त्रिया जादूटोणा (विचक्राफ्ट) कसा करीत असत हादेखील एक प्रमुख विषय असणार आहे. इथल्या प्राध्यापकांच्या मते, सध्याची तरुणाई ज्या अनेक प्रकारच्या मानसिक अथवा सामाजिक समस्यांचा सामना करत आहे, त्यावर जादू हा एक प्रभावी उपाय आहे. तरुणांमध्ये जादूसंदर्भात रुची वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. एक समाज म्हणून आपल्या समस्या सोडवताना आपण कायम नवनवे मार्ग शोधत असतो. मग हा मार्गदेखील वापरून पाहण्यास काय हरकत आहे? आपल्या पूर्वजांनीदेखील अनेक समस्यांचे उपाय तंत्र, मंत्र आणि जादूच्या मदतीने सोडवले होते. या अनोख्या अभ्यासक्रमाची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे .




























































