
>> रविप्रकाश कुलकर्णी
आपद्धर्म’ हे वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे. एकेकाळचे पत्रकार वि.अ. तेंब्रे यांच्या कथा, आत्मचरित्रपर लेख यांचा संग्रह त्यांचा मुलगा प्रमोद तेंब्रे यांनी संपादित करून विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे तो प्रकाशित केलेला आहे. नाशिकच्या ‘गावकरी’सारख्या जिल्हापत्रात ज्याने आपलं सारं आयुष्य पत्रकार म्हणून घालवलं त्या वि.अ. तथा तात्यासाहेब तेंब्रे यांच्या कार्याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे. त्यांच्या बरोबर काम केलेले ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मनोहर शहाणे यांनी म्हटले आहे की, त्या काळात महाराष्ट्रात ‘लोकमान्य’, ‘नवशक्ती’, ‘नवाकाळ’ ही प्रमुख दैनिके होती. त्यांचे संपादक म्हणून अपामे पां. वा. गाडगीळ, प्रभाकर पाध्ये व नीळकंठराव खाडिलकर यांचे अग्रलेख महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात आवडीने वाचले जात. त्यांच्या अग्रलेखातील मुद्दय़ांवर महाराष्ट्राच्या बौद्धिक प्रांतात विचारविनिमय होत. श्री. तात्यासाहेब तेंब्रे यांचे अग्रलेख कमी कुवतीचे नव्हते. त्या काळी नेहमी वाटत असे की, ‘दैनिक गावकरी’चा आवाका खान्देश, नाशिक आणि नगर जिल्हय़ांपुरता मर्यादित नसता तर श्री. तेंबरे यांचे ‘गावकरी’तील अग्रलेख पां. वा. गाडगीळ, पाध्ये, खाडिलकर यांच्या सोबतीने महाराष्ट्रात चर्चिले गेले असते. श्री. तेंब्रे यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व मराठी इतकेच सखोल होते. त्यांच्या इंग्रजी भाषेतील कथा चेन्नई इथून प्रसिद्ध होणाऱया तत्कालीन ‘माय मॅगझिन’ या इंग्रजी मासिकात प्रसिद्ध होत. श्री. तेंब्रे यांनी कधीही त्याचा गवगवा केला नाही.
त्यांच्या पत्रकारितेबद्दल त्यांचे चिरंजीव लिहितात, चाळिसेक वर्षे शब्दश अखेरचा श्वास शिल्लक असेपर्यंत पत्रकारिता आणि काम करीत असलेल्या वर्तमानपत्राचा विचार मनात असलेले दादा कसे होते याचा मला (तेव्हाही आणि आजही) अंदाज घेता आलेला नाही. 18 जून 1978 रोजी ते कोमात गेले. ते जाण्यापूर्वी रात्रपाळी करून मी घरी आलो होतो, तर तसेच त्यांनी मला अग्रलेखाची प्रेस कॉपी देऊन कार्यालयात पाठवले आणि “तो फोरमनला दे आणि मगच घरी ये” असे सांगितले. तो देऊन मी घरी आलो तर ते जवळपास कोमात गेले होते.
असेच आणखी एक उदाहरण. साठावे दशक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे अनेक अर्थाने घुसळणीचे दशक होते. अनेक बाजूने राजकीय आणि सामाजिक मतमतांतरांचा भडिमार आमच्यावर होत होता. सामान्य तरुण भांबावून जाऊन उत्साहाच्या भरात असे काही करून बसत असत की, त्यांचे आयुष्य विस्कळीत होऊन जाई. त्या वेळी त्यांनी लिहिलेले लेखन मार्गदर्शनपर झालेले आहे. यासंदर्भात त्यांचा मुलगा स्वतचेच उदाहरण देतो. तो सांगतो, “मी एका नाटय़ शिबिराला गेलो होतो. तिथले एकंदरीत ग्लॅमर बघून आणि वयाच्या विशीत असल्यामुळे घरी पत्र पाठवून तसे कळवले की, यात आता स्वतला झोकून द्यावे असे मला वाटते आहे. तेव्हा मी हे क्षेत्र निवडतो आहे.” तेव्हा वडिलांनी कळवले, “आप्पा, आंब्याच्या सर्व कोयी रुजवल्या तरी त्यातील एकच कोय रुजते आणि त्याचा आंब्याचा वृक्ष होतो. बाकी साऱयांच्या पिपाण्या होतात. तू ठरव, तुला पिपाणी व्हायचं की वृक्ष?”
या संग्रहातील काही कथा ‘सत्यकथा’, ‘किर्लोस्कर’, ‘हंस’, ‘दीपावली’, ‘मनोहर’, ‘गावकरी’ यांसारख्या अंकांत 1950 ते 1974 या कालावधीत प्रकाशित झालेल्या आहेत. सरळसाध्या या कथा आहेत म्हणूनच परिणामकारकही आहेत. त्यातील ‘शुभांगी’ या कथेकडे लक्ष वेधतो. त्यातील कथाभाग असा… माणूस आणि लेखक यातील अंतर शुभांगीने अनुभवल्यावर तिचं मनोराज्य ती आपल्या मैत्रिणीला सांगते. दोन पातळ्यांवरचा तो ताण म्हणजे ही कथा. शंकर हा अत्यंत भावनापूर्ण आणि शृंगारिक वर्णने कथेत रंगवणारा लेखक, प्रत्यक्षात मात्र रूक्ष आणि व्यवहारी असतो हे त्याच्या पत्नीला अनुभवातून कळल्यामुळे तिचा भ्रमनिरास होतो. मात्र आपल्या मैत्रिणीला ती मनोराज्याचे खोटे चित्र रंगवून सांगते. दुसऱया क्षणाला तिला असे वाटते, आपण हे सत्यात आणावे. कलावंताचे जगणे वास्तवात दोन पातळ्यांवर कसे असू शकते, त्याची कारणे काय असू शकतात, अपेक्षा आणि अपेक्षाभंगाने त्यांना होणारा त्रास… हे सगळे चित्र या कथेत दिसते.
हे सगळे लेखन ग्रंथबद्ध व्हावे अशी वि. अ. तेंब्रे यांची इच्छा होती, असावी. कारण अपामणिकेसहित त्यांनी फाईल करून ठेवली होती. ते गेल्यानंतर त्यांच्या मुलाला ही फाईल सापडली. हे प्रसिद्ध करायला पाहिजे असे त्याला वाटत होते, पण परिस्थितीमुळे ते राहून जात होते, पण आता ती वेळ आल्यामुळे हा अनोखा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. एक प्रकारे मुलाने आपल्या वडिलांना वाहिलेली ही श्रद्धांजलीच आहे. या संग्रहाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे मूळ मासिकात कथेच्या बरोबर जी चित्रे काढलेली होती, त्यांचे पुनर्मुद्रण या कथांबरोबर केलेले आहे. एरवी मासिकात कथेची सजावट चित्रकार स्वत: चित्र काढून करत असतो. मात्र कथासंग्रह करताना ती विसरली जातात. कथांसाठी नावाजलेले चित्रकार अंकातून चित्र काढत असतात. तेवढेच का त्यांचे आयुष्य असते?
‘आपद्धर्म’ संग्रहात कथेबरोबर मूळ मासिकात असलेली चित्रे दिलेली दिसतात. त्यांचे चित्रकार कोण असतील यासाठी तरी हा संग्रह जरूर बघावा.
डॉ. धीरज कुलकर्णी

























































