
अल्पवयीन मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या एका नराधमाला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याखेरीज दोषीला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम या मुलीला भरपाईच्या स्वरुपात दिली जाणार आहे.
ही घटना 2018मध्ये घडली होती. एका गरबा नाईट कार्यक्रमात दोषी पीडितेला भेटला होता. त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर ती गर्भवती राहिली. 16व्या आठवड्यात तिच्या गर्भवती असल्याचं उघड झाल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. तिच्या पोटात जुळी अर्भकं होती. त्यांचे डीएनए जुळवल्यानंतर आणि पीडितेच्या जबाबावर आरोपीला दोषी ठरवण्यात आलं.
या प्रकरणी आरोपीकडून हे नातं संमतीनेच जुळल्याचं सांगण्यात आलं. मात्र, हा युक्तिवाद फेटाळून लावत विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी 27 वर्षीय आरोपीला दोषी मानत 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.



























































