डांबर घोटाळा प्रकरणी नैतिक जबाबदारी समजून उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे वडील रवींद्र सामंत, भाऊ किरण सामंत आणि कुटूंबीयांची मे.आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि.कंपनी आहे. या कंपनीने महाघोटाळा केला आहे. या कंपनीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन शासनाने कारवाई करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू असा इशाराही मिलींद कीर यांनी दिला आहे.

माजी नगराध्यक्ष मिलींद कीर आणि अशोक नाचणकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मे.आर.डी.सामंत कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपुर्वीच मिलींद कीर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन मे. आर. डी. सामंत कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने 80 कोटी रुपयांचा डांबर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत मिलींद कीर म्हणाले की, गेली 20 वर्षे आणि त्यामागील कामांचे रेकॉर्ड तपासले तर कमीत कमी पंधराशे ते दोन हजार कोटींचा घोटाळा सापडू शकतो, असा खळबळजनक आरोप केला आहे. या घोटाळ्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे. शासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, दाद मागू असेही कीर यांनी सांगितले. त्याचबरोबर मे. आर. डी. सामंत कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन या कंपनीला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे कीर यांनी सांगितले. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीमधला घोटाळा आम्ही बाहेर काढला आहे. लवकरच नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि अन्य विभागातील घोटाळे आम्ही बाहेर काढू असा इशारा मिलींद कीर यांनी दिला आहे.