
संपूर्ण देशात एकाचवेळी सर्वस्तरीय निवडणुका घ्यायच्या झाल्यास घटनात्मक दुरुस्त्यांसह आणखी काही बदल करावे लागतील, असे विधी आयोगाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीला सांगितले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, विधी आयोगाने ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीसमोर यासंदर्भातील तपशीलवार सादरीकरण केले आणि अंमलबजावणी करताना येणारे अडथळे स्पष्ट केले. या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह 8 सदस्य आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना समितीचे विशेष सदस्य करण्यात आले आहे.
सध्या भारतात राज्यातील विधानसभा आणि देशाच्या लोकसभा निवडणुका वेगवेगळय़ा वेळी होतात. ‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी, एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान करतील.



























































