मी परळचा दामोदर हॉल बोलतोय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमस्कार… मी तुमचा परळचा दामोदर हॉल बोलतोय… 31 ऑक्टोबरला मला कायमचं टाळं लागलं… पण मला पुनर्जन्म मिळेल का हो…? लालबाग-परळसारख्या गिरणगावातील मराठी माणसाला हक्काचा रंगमंच मिळेल का हो…? कुणीतरी माझं ऐका! मला तुमच्या मदतीची गरज आहे. रसिकांनो, कलाकारांनो, रंगकर्मींनो या… या… तुमच्या दामोदराला, तुमच्या हक्काच्या नाटय़गृहाला तुमच्या मदतीची गरज आहे.

1922मध्ये माझा जन्म झाला. तेव्हापासून आतापर्यंत संगीत रंगभूमी, कामगार रंगभूमी, व्यावसायिक नाटय़ रंगभूमी, हौशी कलाकार, राज्यनाटय़ स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वाद्यवृंद, लोकनाटय़, तमाशा, दहीकाला, नमन यांसारख्या माध्यमातून अनेक रंगकर्मींनी माझा रंगमंच गाजवला. हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्यासह अनेकांचे अभ्यासक, राजकारणी, संशोधक यांचे पदस्पर्श माझ्या रंगभूमीला लागले.

पण आता ना.म जोशींनी केलेल्या समाजसेवेच्या कार्यात उभारलेले हे नाटय़गृह पुन्हा निर्माण होईल का हो…? नाटय़गृह, रंगमंच कामगार यांचे यापुढे कसे होणार…? अखिल भारतीय नाटय़ परिषद, रंगकर्मी, संगीतकार, गीतकार, गायक नृत्यकलाकार, निवेदक, पत्रकार, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, प्रकाश योजनाकार, दिग्दर्शक माझ्या पुनर्निर्माणासाठी धावून येतील का हो…? का मीही या काळोख्या अंधारात रंगमंचाच्या पडद्याआड कायमचा नष्ट होणार? कुणी माझं ऐकताय का? मला तुमच्या मदतीची गरज आहे. या बघा माझ्या विटा कोसळत आहेत… हा ढिगारा बघा माझ्या डोळ्यात जातोय… एकेका कलेच्या आत्महत्येचा धूर होतोय… संपतोय मी… संपतोय मी… या मला वाचवा!