
उत्तर प्रदेशच्या राजधानीतून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सुलतानपूर येथील भाजप आमदार सीताराम वर्मा यांची पत्नी मंगळवारी सकाळी लखनऊच्या इंदिरानगर येथील घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. त्यांच्या मुलाने गाझीपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप आमदार सीताराम वर्मा यांच्या पत्नी पुष्पा यांच्या शोधासाठी पथके तैनात केली आहे. पोलीस उपायुक्त कासिम अब्दी यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले की आमदार सीताराम वर्मा यांचे गाझीपूर सेक्टर-8 मध्ये घर आहे. त्यांची 65 वर्षीय पत्नी पुष्पा वर्मा आपल्या कुटुंबासह येथे राहते. मंगळवारी सकाळी सहा वाजता पुष्पा या कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. बराच शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. ज्यामुळे त्यांच्या मुलाने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पुष्पा यांचा मुलगा पंकज याने आई बेपत्ता झाल्याची गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुपारी आमदार सीताराम वर्मा सुलतानपूरहून लखनऊला पोहोचले. त्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली असून बायकोच्या शोधासाठी त्यांनी उपायुक्तांना विनंती केली आहे. पुष्पा यांच्या शोधासाठी गाझीपूर आणि इंदिरानगर पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहे. सकाळी 9 च्या सुमारास पुष्पा इंदिरानगरमधील अरबिंदो पार्क चौकीजवळ दिसल्या होत्या. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी कैद केलेली दृश्य खंगाळण्याचे काम सध्या सुरू आहे. पुष्पा वर्मा यांना स्मृतिभ्रंश असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.



























































