
कुणालाही कुणाचं नाव बदलण्याचा, वडील बदलण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाला तर नाहीच नाही. निवडणूक आयोग चिन्ह इकडचं तिकडे करू शकतो. पण माझ्या पक्षाचं नाव इतर कुणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, तो आम्ही मानणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
सकाळ माध्यमाचे समूह संपादक राहुल गडपाले लिखित अवतरणार्थ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. कधी शेलक्या शब्दांत तर कधी मिश्कील शैलीत चिमटे काढत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आतापर्यंत सगळा अंधार पसरलाय, आपलं काय होणार ही भीती मनात बाळगणारी लोकं आहेत, त्या सगळ्यांना मला सांगायचंय की, अंधार जरी पसरला असला तरी देखील वणवा जो भडकतो, त्याला एक ठिणगी पुरेशी असते. त्या ठिणगीचं काम तुम्ही करत आहात. सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्ताधाऱ्यांच्या वाळवीने पोखरलेला आहे. त्या स्तंभाला वाळवी लागली आहे. आधी एक शब्द होता, हिडीस कारभार चालला आहे. आता ईडीस कारभार चालला आहे. असा कारभार कधीही चाललेला नव्हता. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना समान न्यायाने वागवा. आपण ना ना आरोप करतो, चौकश्या लावतो किंवा लावल्या होत्या. त्या सगळ्या पटापट बंद करून क्लीन चीट दिली जाते. हे क्लीन चिटर सरकार आहे. आपली लोकं मात्र कुठल्यातरी गोष्टी उकरून काढण्यात येतील. जसं की, भूपेश बघेल आणि महादेव अॅप यांचा आता उल्लेख झाला. भूपेश बघेल भाजपमध्ये गेले तर महादेव अॅपचं पटकन हर हर महादेव होऊन जाईल. एवढं सगळं निर्लज्जपणे सुरू असताना आपण गप्पे कसे बसू शकतो? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.
‘प्रबोधनकार परवडत नाहीत, असं म्हणताना प्रबोधनकार कसे घडले आणि ते प्रबोधनकार का झाले ते समजून घेणं गरजेचं आहे. प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा. मी आता जर म्हणालो की, भाईयों और बहनों मेरा अमरावतीसे बहोत पुराना रिश्ता है…. अरे यात हसण्यासारखं काय आहे? साधं वाक्य आहे… कारण, माझी आजी अमरावतीतल्या परतवाड्याची. मी उगीच फेकाफेकी करणाऱ्यातला नाही. उगाचच जातो तिकडे सगळ्यांशी कितना करीबी रिश्ता है.. नाही बाबा, जे रिश्ते आहेत ते आहेत, जे नाहीत ते नाहीत!! प्रबोधनकार आजोबा म्हणून आम्हा नातवंडांना त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगत. मग लक्षात आलं की प्रबोधनकार कसे घडले. प्रवाहात पडलेला माणूस प्रवाहपतित होतो, असे खूप असतात. पण चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह वळवला पाहिजे. त्यामुळे प्रबोधनकार समजून घेण्यासाठी आधी स्वतःला जसे ते होते, निस्वार्थी, निःस्पृह, निर्भीड तसे असू तरच त्यांच्या गोष्टी करण्यात अर्थ आहे. नाहीतर निर्लज्जाला कधीच निःस्पृह, निर्भीड होता येत नाही. दुसऱ्याचे पक्ष, विचार चोरून आपला पक्ष चालवणाऱ्यांना दिशा, पक्ष काहीही नसतो.’
‘पण त्या काळात प्रबोधकार का घडू शकले? कारण त्यांना जिंकण्याची फिकीर नव्हती आणि हरण्याची भीती नव्हती. काय हरणार आहे मी आणि जिंकायचं तरी काय आहे मला. पण जे चाललंय ते बदललं पाहिजे, हे त्यांना वाटलं. वाईट रुढी परंपरांचा त्याग आणि ढोंगावरती लाथ हे आमचं हिंदुत्व आहे. ढोंगावरती लाथ हे प्रबोधनकारांचंही ध्येय होतं. मग तो कुणीही असु दे. मग आज इतक्या वर्षांनी प्रबोधनकार हवेसे वाटतात पण पेलवत नाहीत. छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती असूनही त्यांनी चालवलेला वारसा तो अजूनही वंदनीय वाटतो. आंबेडकरांना काय जिंकायचं होतं. फुलेंनी महात्मा ही पदवी सरकारकडे मागितली होती का? काम घडत गेलं आणि लोकं ऐकत गेली. आता हे सगळं मोबाईलवर आलेलं आहे. जसं पूर्वी बाईलवेडा हा शब्द होता, आता मोबाईलवेडा हा शब्द आलेला आहे. पटकन इथलं तिथे आणि तिथलं इथे होतं आणि मग त्याच्या बातम्या होतात. सध्याच्या पत्रकारितेत, मला उत्तरं पाहिजेत, कशासाठी पाहिजेत, कसली पाहिजे, त्या दिशेने आपले प्रश्न असले पाहिजेत. ‘
महाविकास आघाडीच्या स्थापनेवरूनही त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. जेव्हा शिवसेना काँग्रेससोबत गेली, तेव्हा म्हणे शिवसेनेची काँग्रेस झाली. अहो तीस वर्षं भाजपसोबत राहून आमचा भाजप नाही झाली तर काँग्रेस कशी होईल? मी नेहमी सांगतो शिवसेनेने भाजपला सोडलंय, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. हिंदुत्वाचं पेटंट भाजपने घेतलेलं नाही. भाजपचं हिंदुत्व मला मान्य नाही. कारण माणसासारखं जगू देणं हे हिंदुत्व आहे. प्रबोधनकारांचं, बाळासाहेबांचं, माझं आणि आदित्यचं हिंदुत्व एकच आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, हे मूळ वाक्य माझं नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. आम्हाला शेंडी-जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही, हेही बाळासाहेबांचं वाक्य आहे. हे बाळकडू प्रबोधनकारांकडून बाळासाहेबांना मिळालं. प्रबोधनकारांचे वडील सीताराम यांच्याबद्दल किती जणांना माहिती आहे? कोरोनासारखी त्यावेळी प्लेगची भयानक साथ आली होती. प्लेगने निधन पावलेल्यांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं. पण, माझ्या आजोबांचे वडील आणि त्यांची मित्रमंडळी पुढे आली. आणि ते काम करताना त्या साथीची लागण होऊन त्यात ते गेले. हा आमचा वारसा आहे. मी घराणेशाहीतला आहे, त्याला मी काय करू शकतो. नशीब तरी उद्धव ठाकरे हे नाव त्यांना नाही दिलं. काही सांगता येत नाही. कुणालाही कुणाचं नाव बदलण्याचा, वडील बदलण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाला तर नाहीच नाही. निवडणूक आयोग चिन्ह इकडचं तिकडे करू शकतो. पण माझ्या पक्षाचं नाव इतर कुणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, तो आम्ही मानणार नाही.’ असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आमदार अपात्रतेबाबत बोलताना त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं कौतुक केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे दोन व्यवस्था आहेत, असं मागे सरन्यायाधीश म्हणाले होते. न्यायव्यवस्था थेट जनतेला बांधील नाही. कारण, आम्ही जनतेतून निवडून येत नाही. आम्ही दिलेला निर्णय विधिमंडळ नाकारू शकत नाही. तुम्हाला तो चुकीचा वाटला तर तुम्ही तिकडे कायदा बदला. तो अधिकार तुम्हाला आहे, असंही ते म्हणाले होते. पण, कायदा न बदलता निर्णय मानणार असं होऊ शकत नाही. आम्ही जनतेला बांधील नाही, हे फक्त अशीच व्यक्ती बोलू शकते जी स्वतः निःस्पृह आहे किंवा निस्वार्थी आहे. सुदैवाने आज तरी सर्वोच्च न्यायालय एका न्यायाने चाललंय हा एक शेवटचा आशेचा किरण मला तिथे दिसतोय. चंद्रचूड हुकूमशाहीला चूड लावतील ही मला खात्री वाटते, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.


























































