
दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्य रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागात एकूण 27 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 19 हजार 400 पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने त्याचा दैनंदिन कामावर भार पडत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दररोज सुमारे 40 लाख प्रवासी करत असून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाडय़ांनी दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे सुरक्षितपणे धावावी म्हणून रेल्वे ट्रकमध्ये ट्रकमन, की-मन, स्टेशन मास्तर, पॉईंटमन, सिग्नल मेंटनर, गार्ड अशी अनेक पदे आहेत. रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने सदर पदांवर पूर्णवेळ कार्यरत असणे कायद्याने बंधनकारक आहे, मात्र सदरच्या भरतीबाबत रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. एकटय़ा मुंबई विभागात ट्रकमनची दोन हजार पदे रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचा दावा रेल्वे कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे.
संपूर्ण रेल्वेत अडीच लाख पदे रिक्त
मध्य रेल्वेबरोबरच इतर रेल्वेमध्येही अनेक पदे रिक्त आहेत. त्यांची एकूण संख्या 2 लाख 42 हजारांच्या पुढे आहे. तर रिक्त असलेल्या पदांमध्ये सुरक्षा विभागाशी संबंधित 1 लाख 70 हजार पदे रिक्त असल्याचा दावा कामगार संघटनांकडून केला जात आहे.

























































