लेख – उत्पादकतेला घड्याळाशी जोडणारा ‘काटे’री सल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राहुल गोखले, [email protected]

उत्पादकता वाढविण्यासाठी केवळ कामाचे तास वाढविणे हा उपाय नाही. कर्मचाऱयांचे जीवनमान उंचावले, एकूणच कार्यसंस्कृतीत किती तास काम यापेक्षा कोणत्या दर्जाचे काम या निकषावर भर देण्यात आला, कामाच्या ठिकाणी कर्मचारी पोहोचेपर्यंतच गळून जाणार नाही अशा पायाभूत सुविधा विकसित केल्या, तंत्रज्ञानाची योग्य साथ घेतली तर कामाचे तास कमी राहूनही उत्पादकता वाढविता येऊ शकते. नारायण मूर्ती यांनी केलेल्या सूचनेमागील कळकळ खरी आहे, पण उत्पादकतेला घडय़ाळाशी जोडणारा हा सल्ला ‘काटे’री जाणीव करून देणार वाटतो.

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत कर्मचाऱयांनी आठवडय़ाला किमान सत्तर तास काम केले पाहिजे असे विधान केले. त्याचे पडसाद उद्योग जगतापासून समाज माध्यमांपर्यंत सर्वत्र उमटले. याचे कारण हा विषय केवळ कामाच्या तासांचा नाही; देशाची उत्पादकता, तरुणांना मिळणारे वेतन, कर्मचाऱयांचे आरोग्य इत्यादी अनेक मुद्दे त्याच्याशी निगडित आहेत. विकसित देशांत पाच दिवसांचा आठवडा असतो आणि आता किमान सात-आठ देशांनी चार दिवसांच्या आठवडय़ाकडे वाटचाल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात, विशेषतः तरुणांनी आठवडय़ाला सत्तर तास काम करावे हा विरोधाभास झाला. कमी दिवसांच्या आठवडय़ाची विकसित राष्ट्रांना परवडणारी चैन भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला परवडणारी नाही असा नारायण मूर्ती यांचा त्यामागील युक्तिवाद, तर कामाचे तास आणि उत्पादकता यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही अशी नारायण मूर्ती यांच्या विधानावर आक्षेप घेणाऱयांची भूमिका. नारायण मूर्ती यांनी केलेल्या विधानाचे समर्थन किंवा विरोध काहीही केले तरी त्या विधानाची चर्चा अवश्य झाली पाहिजे हे मात्र खरे.

नारायण मूर्ती यांच्या विधानाची चर्चा करण्यापूर्वी हे लक्षात घेणे आवश्यक की, संघटित आणि असंघटित असा कामगार-कर्मचारी वर्ग भारतात मोठय़ा प्रमाणावर असल्याने कामाच्या तासांची चर्चा सरसकट होऊ शकत नाही. असंघटित, रोजंदारीवर काम करणारे इत्यादींच्या कामाच्या तासांची गणना करण्याची व्यवस्था नाही. तेव्हा जी काही चर्चा आहे ती प्रामुख्याने संघटित आणि खासगी पंपन्यांच्या माहितीच्या कक्षेत होणारी आहे. नारायण मूर्ती यांना भारताला विकसित राष्ट्र म्हणून पाहण्याची ओढ आहे हे उघड आहे. त्यांनी आपल्या तरुण वयात एका पंपनीची मुहूर्तमेढ रचली आणि तिचे रूपानंतर साम्राज्यात करून दाखविले. तेव्हा त्यांनी स्वतः मेहनत केली आहे आणि त्यामुळे त्यांना सल्ला देण्याचा-सूचना करण्याचा अधिकार आहे हे नाकारता येत नाही. तथापि कालानुरूप परिस्थिती बदलत असते, जीवनमानात फरक होत असतो. नवीन पिढय़ांच्या आशा-आकांक्षा बदललेल्या असतात याचेही भान ठेवणे गरजेचे.

नारायण मूर्ती यांनीच 2020 साली आठवडय़ाचे कामाचे तास किमान साठ असले पाहिजेत असे म्हटले होते. कदाचित मध्यंतरीची दोन वर्षे कोरोनामुळे वाया गेली अशी त्यांची धारणा असेल आणि म्हणून आता त्यांनी तो आकडा सत्तरवर नेला असावा. याचा मथितार्थ असा की, तरुणांनी खूप काम केले पाहिजे. मूर्ती यांच्या या विधानाचे उद्योग जगतातून काहींनी समर्थन केले आहे. जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी सत्तर तासांच्या कामाचा अर्थ अंग मोडून काम करण्याशी नसून कार्यनिष्ठsशी आहे असे म्हटले आहे. 2047 पर्यंत भारताला महासत्ता करायचे तर पाच दिवसांच्या आठवडय़ाची चैन परवडणार नाही अशी त्यांनी ‘री’ ओढली आहे. ‘ओला’चे संस्थापक भाविश अगरवाल यांनी आताची वेळ कमी काम करण्याची नसून सर्व शक्ती पणाला लावून काम करण्याची आहे असे म्हणत मूर्ती यांचे समर्थन केले आहे, तर अपग्रेड या एडटेक फर्मचे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी मूर्ती यांच्याशी असहमती दर्शवत कामाच्या तासांपेक्षा कामाचा दर्जा अधिक महत्त्वाचा आहे असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांच्या मतांची गोळाबेरीज हीच की, भारताची उत्पादकता वाढणे आवश्यक आहे, तरच भारत महासत्ता होण्याचा संकल्प सत्यात उतरवू शकतो यावर त्यांचे एकमत असले तरी त्यासाठीच्या मार्गांबद्दल मात्र एकवाक्यता दिसत नाही.

केवळ कामाचे तास वाढवून उत्पादकता वाढविता येते यावर मतभिन्नता आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) केलेल्या पाहणीनुसार भारतात कामाचे तास अन्य अनेक देशांच्या तुलनेत अधिक आहेत. दर आठवडय़ाला प्रति कामगार-कर्मचारी कामाचे सरासरी तास 47.7 इतके आहेत आणि या निकषावर भारत सातव्या क्रमांकावर आहे. ज्या देशांत जास्त तास काम केले जाते त्यांत कतार, गँबिया, कांगो असे देश आहेत. त्या पंक्तीत भारताने जाऊन बसायचे का, हा प्रश्न अस्थानी नाही. नारायण मूर्ती यांनी आपल्या प्रतिपादनाला पुष्टी म्हणून दुसऱया महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने राबविलेल्या अधिक कामाच्या तासांचे उदाहरण दिले आहे. तथापि ते युद्ध संपून आता ऐंशी वर्षे होत आली आहेत. या काळात तंत्रज्ञानाने कात टाकली आहे. ‘आधुनिक’ आणि ‘स्वयंचलित’ या शब्दांनी मानवी जीवन व्यापून टाकले आहे. अशा स्थितीत जास्त काम केल्याने उत्पादकता वाढेलच असे ठामपणे सांगता येणार नाही. अर्थात भारताची उत्पादकता कमी आहे हे मूर्ती यांचे निरीक्षण योग्य आहे.

‘ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कामाचे तास कमी केल्याने उलट उत्पादकता वाढते असे निरीक्षण आहे. अर्थात याचा अर्थ केवळ कामाचे तास कमी केल्याने ते होते असे नाही; तंत्रज्ञानाच्या विकासाचेही त्यात योगदान आहे. याचाच अर्थ कामाचा अवधी यापेक्षा कामाची फलनिष्पत्ती काय? हा निकष महत्त्वाचा. उत्पादकता मोजण्याचे परिमाण म्हणजे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी). ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ने 2019 ची आकडेवारी प्रकाशित केली आहे; त्यात प्रति तास उत्पादकतेच्या बाबतीत आयर्लंड पहिल्या स्थानावर (125.09 डॉलर), फ्रान्स नवव्या स्थानावर (68.63 डॉलर), आइसलँड तेराव्या स्थानावर (64.24 डॉलर), स्पेन सतराव्या स्थानावर (56.31 डॉलर), इंग्लंड विसाव्या स्थानावर (54.35 डॉलर) तर भारत 64 व्या स्थानावर (8.7 डॉलर) अशी स्थिती आहे. तुलनेसाठी ज्या अन्य देशांचा उल्लेख येथे करण्यात आला आहे तो यासाठी की, त्या देशांनी पाच दिवसांच्या आठवडय़ाकडून चार दिवसांच्या आठवडय़ाकडे वाटचाल केली आहे आणि तरीही ताशी उत्पादकतेच्या बाबतीत ते भारताच्या तुलनेत खूपच आघाडीवर आहेत. ज्या लक्सेम्बर्गची ताशी उत्पादकता 80 डॉलर आहे, तेथे तर आठवडय़ाचे कामाचे तास केवळ 29 आहेत. तेव्हा ‘अधिकस्य अधिपं फलम’ हे सर्वत्रच लागू होते असे नाही.

काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधून कामाच्या ठिकाणी कर्मचाऱयांच्या येण्या-जाण्यापासून अन्य पायाभूत सुविधांचे उचित जाळे निर्माण करून कामाच्या ठिकाणी बैठकांपेक्षा कर्मचाऱयांना स्वतंत्रपणे काम करण्यास प्रेरित करणारे वातावरण निर्माण करून, कामाला आवश्यक प्रतिष्ठा देऊन कामाचे समाधान कर्मचाऱयांना मिळेल अशी कार्यसंस्कृती विकसित करूनच उत्पादकता वाढविली जाऊ शकते. किंबहुना कर्मचाऱयांची सर्वाधिक उत्पादकता किती वर्षे देऊ शकतात याबाबतीत भारतात सात वर्षे तर फिनलँडमध्ये 28 वर्षे इतकी मोठी दरी आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱयांत उत्साहच टिकला नाही, तर कामाचे तास वाढवून उत्पादकतेऐवजी कामाचा आभास निर्माण करण्याकडे कल वाढू शकतो. अधिक कामाने उत्पादकता वाढेल, की त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होईल हेही तपासणे गरजेचे आहे.