
>> अश्विन बापट
प्रकाशोत्सव दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सारेच आतुर झालोय. दिवे, रांगोळी, पणतीसोबत दिवाळीचा फराळ या सणाची रंगत, गोडवा आणखी वाढवतो. हे पदार्थ वर्षभर मिळत असले तरीही दिवाळीत चिवडा, लाडू, करंजी खाण्याची मजा काही औरच. फराळाचे हे पदार्थ तयार करण्याची सध्या गिरगावातील पूर्वा सप्रेंची लगबग सुरू आहे.
या व्यवसायाबद्दल पूर्वा सप्रे म्हणाल्या, मी मूळची रत्नागिरीची. माझे वडील, काका याच व्यवसायातले. ते केटरिंगच्या ऑर्डर्स घेत असत. तिथपासून मला याची आवड निर्माण झाली. आधी मी फक्त टिफिन देत असे. आता दिवाळी फराळ, पुरणपोळी, मोदक असे पदार्थ करते. मी 2008-09 पासून हे पदार्थ नियमितपणे करतेय. मी गिरगावपासून ते विरार व कल्याणपर्यंत दुकानांमध्येही हा फराळ विक्रीसाठी पाठवते. माझा हा फराळ अनेक दुकानांतून थेट अमेरिकेपर्यंत पोहोचलाय.
या कामासाठी सध्या मी पाच जणींना सोबत घेतलेय. त्यांना त्यांच्या कामानुसार मी योग्य मोबदला देते. दुपारी साडेतीन ते रात्री नऊ असे त्यांचे वेळापत्रक असते, तर मला मात्र सकाळी सहा ते रात्री दहा अशा वेळेत काम करावे लागते. म्हणजे हे पदार्थ करून झाल्यावर आवराआवर, त्याचे पॅकिंग नीट करणे, त्याची डिलिव्हरी करणे हेही व्यवस्थित पार पडणे गरजेचे आहे. यासाठी मला माझा चुलत भाऊ योगेशची मोलाची मदत होते, तर माझे पती हेमंत सप्रे यांच्या या व्यवसायातील अनुभवाचाही मला फायदा होतो.
याखेरीज माझे नेहमीचे मागणीतले पदार्थ म्हणजे पुरणपोळी, मोदक. होळीला मी अंदाजे सहा हजार पुरणपोळय़ा करते. गिरगावात मी जेवणही तयार करून देते, असे पूर्वा म्हणाल्या. येत्या काळात चिरोटय़ा व इतर पदार्थही त्यांच्या मेन्यूमध्ये येतील.
15 हजार करंज्या
फराळाच्या पदार्थांमध्ये करंजी ही माझी स्पेशालिटी आहे. याही वर्षी 15 हजार करंज्या तयार करण्याचे माझे ध्येय आहे. दसरा झाल्यापासून या कामाला सुरुवात करावी लागते. त्यातही हाताने कापून करंजी बनवणे आणि तळणे हे करंजी बनवण्यातले आव्हानात्मक टप्पे आहेत. करंजीमधल्या पदार्थांचं प्रमाण, तळण्याची प्रक्रिया हे सारं अगदी व्यवस्थित जमून यावं लागतं. मग त्याची चव तुमच्या मनाला भावते. करंजीसारखेच माझे बेसन लाडूही खूप मागणीत असतात. यंदा आमच्याकडे बनणाऱया बेसन लाडू , रवा लाडू, अनारसे, चिवडा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चकली यांना खूप मागणी आहे.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)






























































