उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला; 40 मजूर अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या उत्तर काशी येथील मजुरांसाठी रविवार हा घातवार ठरला. निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल 50 मीटरपर्यंतचा भाग पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन कोसळला. या बोगद्यात 40 मजूर अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱयाखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात, असे अधिकाऱयांनी म्हटले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱयांनी अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. ब्रह्मकमल आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा आणि डंडलगावदरम्यान या बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर असून रुंदी 14 मीटर इतकी आहे.

सर्व मजूर सुरक्षित
बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सुरक्षित असल्याचे उत्तर काशीचे पोलीस अधीक्षक कर्पण यदुवंशी यांनी म्हटले आहे. कामगारांकडे ऑक्सिजन सिलिंडरदेखील असून एक ऑक्सिजन पाईपही बोगद्यात पोहोचवल्याची माहिती त्यांनी दिली. बोगद्यातील ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.