
साखळी फेरीत दमदार कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ‘चोकर्स’चा शिक्का पुसण्यास पुन्हा अपयशी ठरला. दुसऱया उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारत कारकीर्दीत आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक दिली. आता रविवारी यजमान हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यात जगज्जेतेपदाचा फैसला होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला 212 धावसंख्येवर रोखल्यानंतर डेव्हिड वॉर्नर (29) व ट्रव्हीस हेड (62) यांनी ऑस्ट्रेलियाला टॉप गियरमध्ये सुरुवात करून दिली. वॉर्नरने 18 चेंडूंमधील 29 धावांच्या देखण्या खेळीत एका चौकारासह चार टोलेजंग षटकार ठोकले. त्याने हेडच्या साथीत 6.1 षटकांत 60 धावांची जोरदार सलामी दिली. शेवटी एडम मार्करमने वॉर्नरचा त्रिफळा उडवून ही जोडी पह्डली. पुढच्याच षटकात पॅगिसो रबाडाने आलेल्या मिचेल मार्शला भोपळाही पह्डू न देता माघारी धाडले. ट्रव्हीस हेडने 48 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. केशव महाराजने त्याचा त्रिफळा उडविला.
सोपा सामना केला अवघड
त्यानंतर स्टीव्हन स्मिथ (30) आणि मार्नस लाबुशेन (18) यांनी अतिशय संथ खेळी करीत सोपा सामना थोडा अवघड करून टाकला. स्मिथने 30 धावांसाठी 62 चेंडू खाल्ले, तर लाबुशेननेही 18 धावांसाठी 31 चेंडूंचा सामना केला. ग्लेन मॅक्सवेलही (1) अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव संकटात सापडला. तबरैझ शमसीने त्याचा त्रिफळा उडविला. मग जोश इंग्लिस 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर मिचेल स्टार्क (नाबाद 16) व कर्णधार पॅट कमिन्स (नाबाद 14 ) यांनी निकराची झुंज देत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोईट्झी व तबरैझ शमसी यांनी 2-2, तर रबाडा मार्करम व केशव महाराज यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
त्याआधी वातावरण ढगाळ होतं, पण आजच्या सामन्यात कुणीच बरसला नाही. ना फलंदाज बरसले ना पाऊस. केवळ पावसाने हजेरी लावली. तसेच डेव्हिड मिलरनेही पाच खणखणीत षटकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका कसाबसा 213 धावांपर्यंत पोहोचला. सर्वात धक्कादायक म्हणजे हवेत गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे नाणेफेक जिंकूनही टेम्बा बवुमाने घेतलेला निर्णय धाडसी वाटला. क्षेत्ररक्षणाऐवजी फलंदाजीचा निर्णय घातक वाटला.
नाणेफेक जिंकून स्वतः बवुमा मैदानात उतरला आणि पहिल्याच षटकात भोपळा न पह्डताच बाद झाला. तो बाद झाल्यावर आफ्रिकन फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे तर अक्षरशः शरणागती पत्करली. स्पर्धेत चार शतके ठोकणारा क्विंटन डिकॉकही अवघ्या तीन धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ रॅसी डय़ुसेन आणि एडन मार्करमचीही विकेट गेल्यामुळे आफ्रिकेची 4 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था झाली.
पहिल्या 12 षटकांतच दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडल्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. तेव्हा हेन्री क्लासन आणि डेव्हिड मिलरने संघाला सावरले आणि कठीण स्थितीतून बाहेर काढले. त्यांच्या धावांची गती फार कमी असली तरी प्रत्येक धाव त्यांच्यासाठी ऑक्सिजनसारखी होती. क्लासन 47 धावांवर बाद झाला. फलकावर 119 धावा लागल्या होत्या. पुढच्या चेंडूवर हेडने माकाx यान्सनलाही टिपत 6 बाद 119 अशी धावसंख्या केली. मात्र त्यानंतर डेव्हिड मिलरने एकहाती किल्ला लढवला. जास्तीत जास्त स्ट्राइक स्वतःकडे ठेवत त्याने 8 चौकार आणि 5 षटकार ठोकत आपले स्पर्धेतील पहिले झुंजार शतक झळकावले. त्याच्या संघर्षामुळे दक्षिण आफ्रिका 213 पर्यंत पोहोचू शकली.
ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने भन्नाट गोलंदाजी करताना 8 षटकांत केवळ 12 धावा देत 2 विकेट टिपले. तसेच स्टार्क आणि कमिन्सने प्रत्येकी 3 विकेट घेत आफ्रिकन डावाला लवकर गुंडाळण्यात यश मिळवले.

























































