कुलगामजवळ लश्करचे पाच दहशतवादी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terrorist

कुलगाम जिह्यातील नेहमा गावाजवळ 18 तास चाललेल्या चकमकीअंती लश्कर ए तोयबाच्या 5 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी ठार मारले. जंगलभागात रात्रभर झालेल्या चकमकीअंती मारल्या गेलेल्या या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

हे मृतदेह हुडकण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आल्याचे जम्मू-कश्मीरचे महासंचालक व्ही. के. बिर्दी यांनी सांगितले. नेहमाजवळील सामनू जंगलभागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी गुरुवारी या भागात नाकेबंदी आणि शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केल्यावर चकमकीला सुरुवात झाली.

राजौरीतही खात्मा
राजौरी जिह्यातील गुल्लेर-बेहरोटे भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या नाकेबंदी आणि शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीतही एक दहशतवादी मारला गेला.