
आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकत टीम इंडियाला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याच इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 20 वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2003 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मुकाबला झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. आता टीम इंडियाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.
या सामन्याच्या सुरवातीला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग इलेल्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मला प्रथम फलंदाजी करायची होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असली तरी आम्हाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. आता आमचा संघ फलंदाजीसाठी सज्ज आहे.
सामन्यापूर्वी वायुसेनेने थरारक एअर शो केला आहे. यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामना सुरू होईल.
टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड






























































