आमदार अपात्रता सुनावणीत मिंधे गटाचा टाईमपास, व्हीपवरून सुनील प्रभूंची गुन्हेगारासारखी उलटतपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार अपात्रता सुनावणीमध्ये मिंध्यांकडून पुन्हा टाईमपास सुरू झाला आहे. आज शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीमधून ते स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्हीपबाबत सर्वकाही नमूद असतानाही त्याच मुद्दय़ावरून मिंध्यांचे वकील महेश जेठमलानी यांनी आज प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र प्रभू यांनीही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तितकेच मुद्देसूद आणि सडेतोड उत्तर दिले. एखाद्या गुन्हेगारासारखी त्यांची उलटतपासणी घेतली जात होती. त्याला तीव्र आक्षेप घेत सुनील प्रभू यांनी बाजू मांडली.

विधान भवनात सलग दुसऱया दिवशी आज सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेण्यात आली. 21 जून 2022 रोजी प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना पाठवलेल्या व्हीपवरून मिंधे सरकारचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना प्रश्न विचारले. हा व्हीप कोणत्या अधिकारात दिला, असे जेठमलानींनी विचारले. त्यावर पक्षाचा विधानसभेचा प्रतोद म्हणून व्हीप दिला असे प्रभू यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीनंतर काही आमदार मिसिंग होते म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशावरून आमदारांची बैठक बोलवून माहिती घ्यावी म्हणून व्हीप देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हीपबाबत लेखी सूचना दिल्या होत्या की तोंडी दिल्या होत्या, असे जेठमलानी यांनी प्रभू यांना विचारले. त्यावर लेखी सूचना दिली होती की नाही मला आठवत नाही, ते ऑन रेकॉर्ड आहे, असे प्रभू यांनी सांगितले. अशा बैठका तातडीने बोलवल्या जातात त्यावेळी टेलिपहनिक आदेश दिले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलवरून दिल्या होत्या की लॅण्डलाईनवरून, असेही जेठमलानी यांनी प्रभू यांना विचारले. आपण प्रतिज्ञापत्रात यासंदर्भात माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हीप बजावल्याची तारीख आणि त्यावरील प्रभू यांच्या सहीवरून महेश जेठमलानी यांनी व्हीप बनावट असल्याचा दावा केला. त्यावर आपण आपली खोटी सही करू शकत नाही आणि आपल्या दोन प्रकारच्या सह्या आहेत असे प्रभू यांनी स्पष्ट केले. साडेदहा किंवा साडेअकराची वेळ होती. पक्षप्रमुखांचा पह्न आला. पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवा असे सांगण्यात आले, त्यानंतर व्हीप तयार केला आणि मग जे संपका&त होते त्यांना देण्यात आला, असेही ते पुढे म्हणाले.

21 जूनचा व्हीप आणि प्रतिज्ञापत्रावरील सहीवरूनही जेठमलानी यांनी प्रभू यांना विचारणा केली. त्यावर आपल्या दोन प्रकारच्या सह्या आहेत, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. तसेच व्हीप पाठवला तेव्हा रात्री साडेअकरा वाजले होते. त्यामुळे त्यावर दुसऱया दिवशीची तारीख होती, असेही प्रभू म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप लागू होता, असेही त्यांनी सांगितले.

व्हीप दिला त्यानेही तो स्वीकारावा अशी कार्यपद्धती शिवसेनेत आहे का? 20 जूनला आपल्या म्हणण्यानुसार तुम्हीसुद्धा व्हीपची पोचपावती घेतली का? ज्या व्हीपची पोचपावती तुम्ही दिली म्हणता तो व्हीप कोणी आमदारांनी दिला की तुम्ही दिला ? तुम्ही व्हीप दिला, पोचपावती घेतली तर तुम्हाला व्हीप कोणी दिला ? असे एकापाठोपाठ एक प्रश्न जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना विचारले. त्या प्रत्येक प्रश्नाला प्रभू यांनी मुद्देसूद उत्तरे दिली.

‘विधिमंडळ सदस्याने व्हीप पाळणे क्रमपात्र आहे अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे. जर मी व्हीप घेतला तर मला पोचपावती व्हीपची द्यावीच लागते… मी पोचपावती दिली. व्हीपवर मी सही केल्यानंतर प्रत्यक्ष त्या आमदारांना व्हीप देण्याचे काम पार्टी कार्यालयाचे कर्मचारी करतात. मी बजावलेला व्हीप घेतला आणि त्यावर सही केली… पार्टी ऑफिसमध्ये नियमानुसार व्हीप स्वीकारला आणि व्हीप स्वीकारल्याचा सहीचा कागद त्या कर्मचाऱयाकडे दिला… जबाबदार कर्मचारी हे काम करत असतात,’ असे प्रभू यांनी सांगितले.

20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का? होते तर कोणते आमदार मिसिंग होते? असेही जेठमलानी यांनी प्रभू यांना विचारले. त्यावर प्रभू म्हणाले की, सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते हे जर चेक करायचे असेल तर विधान भवनाच्या पटलावर दिसून येईल. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या कीð शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बऱयाच आमदारांचे पह्न बंद होते. त्यानंतर सातत्याने मीडियामध्ये हे आमदार गुजरातच्या दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या.

आमदार मिसिंग असल्याने व्हीप बजावल्याच्या प्रभू यांच्या उत्तरावर जेठमलानी यांनी मिसिंग आमदारांची नावे विचारली. त्यावरून जोरदार खडाजंगी झाली. हे सर्व रेकॉर्डवर असून सोबत कोण होते ते आता आठवत नाही, असे प्रभू म्हणाले. अपात्रता याचिकेत त्या आमदारांची नावे दिली आहेत असेही त्यांनी सांगितले.

जे 21 तारखेच्या बैठकीला गैरहजर होते ते आमदार मिसिंग होते. बैठकीनंतरसुद्धा आम्ही दोन-अडीच तास वाट पाहिली तरी ते आले नाही त्यांना मी मिसिंग समजतो. कारण काही जणांना व्हीप गेला नसेल, काही कारणास्तव ते रेंजमध्ये नसतील, आजारी असतील म्हणून आम्ही बैठकीपर्यंत वाट पाहिली, असे प्रभू यांनी सांगितले.

प्रत्यक्ष व्हीप दिला त्या आमदारांची नावेही प्रभू यांनी सांगितली. त्यात राहुल पाटील, उदयसिंह राजपूत, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्पेकर, अजय चौधरी, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, संजय पोतनीस यांचा समावेश होता.

प्रतिज्ञापत्रात दिलंय तेच विचारताय, तुमची स्मरणशक्ती तपासताय का? शिवसेनेच्या वकिलांचा मिंध्यांच्या वकिलांना सवाल

व्हीपसंदर्भात महेश जेठमलानी हे प्रभू यांच्यावर त्याच-त्याच प्रश्नांचा भडिमार करत होते. त्याला शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी तीव्र आक्षेप घेतला. प्रतिज्ञापत्रात सविस्तरपणे जी माहिती दिली आहे तीच विचारताय, तीच तुम्हाला आठवत नसेल तर तुमची स्मरणशक्ती तपासताय का? असे कामत म्हणाले.

जेठमलानींचा दावा खोटा

व्हीप बनावट असल्याचा दावा करत त्याची पुष्टी करण्याचाही प्रयत्न यावेळी महेश जेठमलानी यांनी केला. मूळ व्हीपवर पाठवणाऱयाचे नाव नसते का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर तो पक्षादेश असतो, त्यावर पाठवणाऱयाचे नाव नसते, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. 20 जून 2022 चा मूळ व्हीप तुम्ही तयार केला नव्हता, असेही जेठमलानी म्हणाले. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे, असे प्रभू यांनी ठामपणे स्पष्ट केले.

…तर सुनावणी वेळेत पूर्ण करणे अवघड होईल – विधानसभा अध्यक्ष

ज्या गतीने सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. मला 31 डिसेंबर पर्यत हे प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्टय़ा आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसांचा कालावधी आहे. या गतीने जर सुनावणी जात असेल तर प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल, असे नार्वेकर यावेळी म्हणाले.

मी काही गुन्हेगार नाही

मिंध्यांचे वकील जेठमलानी हे प्रभू यांना खोदून खोदून प्रश्न विचारत होते. स्पेसिफीक उत्तर द्या, गोल गोल फिरवू नका, असेही जेठमलानी म्हणाले. जेठमलानी यांच्या उलटतपासणीच्या पद्धतीला प्रभू यांनी तातडीने आक्षेप घेतला. मी काही गुन्हेगार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या कक्षेतच सुनावणी व्हावी, केवळ वेळकाढूपणा सुरू आहे

सर्वेच्च न्यायालयाने सुनावणीच्या कक्षा ठरवून दिल्या आहेत. त्या कक्षेत राहूनच सुनावणी व्हायला हवी. व्हीप वगैरे बाबी ज्या सर्वेच्च न्यायालयाच्या सुनावणीत सिद्ध झाल्या आहेत त्या चुकीच्या ठरविण्याचा अधिकार वकिलांना नाही. सुनील प्रभू यांनी त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे, असे शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी सुनावणीनंतर सांगितले.