
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बहुमताने विजयी होईल आणि शिवसेनेच्या 16 आमदारांची संख्या 160 वर पोहोचेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 16 आमदार असूनही शिवसेना महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करतेय आणि 160 आमदार झाले तरीही करत राहणार, असेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय कोकण दौऱयावर आहेत. खळा बैठकांच्या माध्यमातून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत असले तरी प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांकडूनही आदित्य ठाकरे यांचे आवर्जून स्वागत केले जात आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे त्यांच्या खळा बैठका झाल्या. खोके सरकारच्या मनामध्ये शिवसेनेची इतकी भीती बसली आहे की, त्यांनी मुंबई विद्यापीठाची निवडणूकच रद्द केली. हीच ताकद आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी करून दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले
उद्घाटने होत असतील तर मी आणखी दोन दिवस दौरा वाढवतो.
आदित्य ठाकरे हे कोकण दौऱयावर असताना मिंधे सरकारने डिलाईल रोड पुलाचे आज उद्घाटन केले. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगलाच टोला लगावला. मी मुंबईबाहेर पडल्यानंतर सरकार जनहिताच्या प्रकल्पांची उद्घाटने करत असेल तर मी माझा दौरा आणखी दोन दिवस वाढवतो. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे आणि दिघा रेल्वे स्थानकासह इतर चार-पाच प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्यांचीही उद्घाटने करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्याचे उद्योग खाते सपशेल फेल
आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱयावरून मिंधे सरकारचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली होती. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी आपण दावोसला 24 तासांत 48 कोटी रुपये उडवायला गेलेलो नाही, असा टोला सामंत यांना लगावला. गेल्या दीड वर्षात उद्योग खाते फेल गेले असून एकही नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही, अगदी हक्काची वर्ल्ड कपची फायनलही हे सरकार वानखेडेला ठेवू शकले नाही, गुजरातला पाठवली, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. मिंधे सरकारने जनतेचा पैसा भ्रष्टाचारामध्ये लुटून परराज्यांत, दिल्लीला नेला त्याचे वाईट वाटतेय, असेही ते म्हणाले.
खोके सरकार पडले नाही तर विधानसभा अध्यक्ष संविधानविरोधी ठरतील
आमदार अपात्रतेचा निकाल 31 डिसेंबरला संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे लागला तर खोके सरकार नक्कीच कोसळणार, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. संविधानाचा मान राखायचा असेल तर विधानसभा अध्यक्ष जे या सुनावणीत लवाद म्हणून काम करत आहेत त्यांना हे सरकार बाद करावेच लागेल, नाहीतर ते स्वतः संविधानविरोधी ठरतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जे सरकार घटनाबाह्य होते ते पहिल्याच दिवशी बाद व्हायला हवे, ते चाललेच कसे? असा सवालही त्यांनी केला.
पातोळी, मोदक, कणगी आणि करांदे
खळा बैठकीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी कोकणातील प्रसिद्ध व्यंजनांचाही आस्वाद घेतला. त्यात त्यांच्या आवडत्या पातोळीसह उकडीचे मोदक, कणगी, करांदे आदींचा समावेश होता.






























































