
उत्तरप्रदेशच्या हातरसमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. लग्नमंडपात तीन फेरे घेतल्यानंतर नववधूने अचानक लग्न करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मंडपात एकच खळबळ उडाली. मात्र कारण ऐकून सगळेच थक्क झाले.
हाथरस जिल्ह्यातील नगला नवल गावातील जितेंद्र (28) याचे लग्न फिरोजाबाद येथील पचोखरा येथे राहणाऱ्या भावनाशी ठरले होते. 23 नोव्हेंबरला दोघांचे लग्न होते. नवरदेव वरात घेऊन आला होता. सादाबाद येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्नसोहळा आयोजित केला होता. एकमेकांना वरमाळा घातल्यानंतर दोघांनी सप्तपदी घ्यायला सुरुवात केली. मात्र तीन फेरे घेतल्यानंतर भावनाला तिचा होणारा नवरा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तिने फेरे थांबवून लग्न करण्यास नकार दिला. भावना म्हणाली जितेंद्र बेवडा आहे आणि तिच्या वडिलांकडे 15 लाखांचा हुंडा मागत आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत लग्न करणार नाही असे तिने जाहीर केले.
तर नवरदेवाच्या म्हणण्यानुसार, त्याला दारुचे व्यसन नाही आणि त्याने हुंडाही मागितला नाही. तरुणाचा आरोप आहे की, ज्या मुलीशी माझे लग्न होणार होते ती घटस्फोटीत आहे. मात्र ही गोष्ट मुलीच्या घरच्यांनी लपवली होती. कोतवाली निरीक्षक सादाबाद मुकेश कुमार यांच्यानुसार, दोन्ही पक्षांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र व्यर्थ ठरले. अखेर लग्न न करता दोन्ही पक्ष आपआपल्या घरी गेले.




























































