मराठा आणि ओबीसींचे ताट वेगवेगळे असले पाहिजे! आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या आरक्षणाचा वाद सुरू झाला आहे. पण ओबीसी समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे व मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मांडली. सध्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून एका समाजाला दुसऱया समाजाच्या विरोधात भिडवले जात आहे. स्वतःचे कुटुंब सेफ ठेवायचे आणि दुसऱयांना आपसात भिडवायचे अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणावरून सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले.

ते म्हणाले, सध्या राज्यात मराठा व ओबीसी असा आरक्षणावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात वातावरण पेटले आहे, मात्र जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत बसला आहे तोपर्यंत रयतेच्या मराठय़ांना आरक्षण मिळणार नाही. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुजात आंबेडकर, रेखा ठाकूर, अरुण जाधव, प्रा. किसन चव्हाण, नीलेश विश्वकर्मा, लालसू नागोरी आदींची भाषणे झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेसाठी शुभेच्छा दिल्या.

माझ्या नादी लागू नका

यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांचे नाव घेऊन त्यांना इशारा दिला. सध्या आरक्षणावरून वाद सुरू आहे. पण ओबीसी गटाच्या नेत्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये. इतिहास काढला तर मंडलच्या वेळेस तुम्ही ‘मंडल’बरोबर नव्हता तर ‘कमंडल’बरोबर होतात. मग ते भुजबळ असोत किंवा शेंडगे असोत. तुम्हाला तुमचे आरक्षण वाचवता येत नाही म्हणून हे सर्व सुरू आहे. मात्र ओबीसींचे आरक्षण आम्हीच मिळवून दिले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जरांगे-पाटलांना सबुरीचा सल्ला

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या सल्लागाराने सोनिया गांधी यांना गुजरातमध्ये ‘मौत का सौदागर’ हा शब्द वापरायला सांगितला होता. त्या एका वाक्याने 2009 मध्ये काँग्रेसचे येणारे सरकार आले नाही. आता जरांगे-पाटील यांनी त्यांच्या सल्लागारांचे ऐकू नये. सोनिया गांधी यांनी सल्लागारांचे ऐकण्याची जी चूक केली होती ती जरांगे-पाटील यांनी करू नये.

मोदी रिंगमास्टर

यावेळी त्यांनी भाजप, संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी यांचे वर्णन ‘रिंगमास्टर’ अशी केली.

आम्ही संविधान बदलणाऱयांच्या विरोधात

भाजप व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांचे मित्र मंडळ संविधान बदलणार असे उघडउघड बोलत आहे. पण आम्ही संविधान वाचवणाऱयांच्या बाजूने आहोत. संविधान बदलणाऱयांच्या विरोधात आमचे मत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

3 डिसेंबरनंतर नरसंहार

आरक्षणाच्या नावावर एका समाजाला दुसऱया समाजाच्या विरोधात लढवले जात आहे. हे थांबवण्याऐवजी त्याला खतपाणी घातले जात आहे. 2004 मध्ये गोध्रा, 2023 मध्ये मणिपूर हिंसाचार आणि 3 डिसेंबरनंतर नव्याने नरसंहाराची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर राजकारणाचे उग्र स्वरूप पाहायला मिळेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

राहुल गांधींचे पत्र

नवी दिल्ली ः काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवले आहे. संविधान वाचवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. तुमच्या या संविधान सभेला यायचे होते, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने मी येऊ शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.