फडणवीसांमुळे गेले मराठ्यांचे आरक्षण, पृथ्वीराज चव्हाण यांची घणाघाती टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prithviraj-chavan

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना 2014 मध्ये मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण दिले होते. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारला ते टिकवता आले नाही. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी परत मराठा आरक्षणाचा कायदा केला, पण ही निव्वळ फसवणूक होती. मराठय़ांचे आरक्षण हे फडणवीसांमुळे गेले आहे, अशी घणाघाती टीका कॉँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये 102 वी घटना दुरुस्ती करून राज्यांचे सर्व मागासवर्ग ठरविण्याचे अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे फडणवीस यांना आरक्षण देण्याचा अधिकारच नव्हता. तरीदेखील त्यांनी 16 टक्यांऐवजी 12 टक्के आरक्षणाचा कायदा करून मराठा समाजातील लोकांची फसवणूक केली. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सामाजिक वातावरण दूषित होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मी हाताळला. कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. त्यावेळी आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. यामध्ये मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून 2014 मध्ये 16 टक्के आरक्षण दिले होते. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

आयाराम-गयाराम संस्कृतीला भाजपकडून प्रोत्साहन

आयाराम-गयाराम संस्कृती थांबवण्यासाठी राजीव गांधींनी पक्षांतरबंदी कायदा आणला, पण अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना या कायद्यात सुधारणा आणि बदल झाल्यामुळे तो कुचकामी ठरला. या कायद्याने कुठलीही पक्षांतरबंदी थांबत नाही. आयाराम-गयाराम संस्कृतीला भाजपकडून प्रोत्साहन दिले जात आहे. ‘महाराष्ट्रातील जनतेने अशा प्रकारे वागणाऱया राजकीय नेत्यांना जागा दाखवली पाहिजे. दुसरी जबाबदारी पंतप्रधान मोदींची आहे. मोदींनी मान्यता दिली नसती तर महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नसता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यासाठी भुजबळांचा वडेट्टीवारांना चारवेळा फोन

हिंगोलीत 26 नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे. जालन्याच्या सभेत मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या भाषणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा होती. पण वडेट्टीवार यांनी भुजबळ यांनी तीन ते चार वेळा पह्न केल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.

श्रीमंतांनी आरक्षण घेऊ नये

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे हे मला मान्य नाही. ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे त्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे. श्रीमंतांनी आरक्षण घेऊ नये, असे स्पष्ट मत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असेही ते म्हणाले. राज्यात 1980 पर्यंत जात हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता, 1985 नंतर मात्र परिस्थिती बदलली. जातीचा आणि आर्थिक विषयाचा काहीही संबंध नाही. पण राज्यात सुरू असलेली परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागते, पुढे काय होईल सांगता येत नाही. आरक्षण देण्याचे सरकारने कबूल केले असेल तर ते त्यांनी द्यायला हवे, कायद्याच्या चौकटीत ते कसे बसवायचे हे सरकारने ठरवावे, असे शिंदे म्हणाले.