रंगनाट्य : ‘प्रयोग’शील बैठकीचा रंगमंचीय थाट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज चिंचणकर

रंगमंचीय अवकाशाचा ढाचा बदलत रसिकांना नाटकात सामावून घेणारे नाटक.

रंगमंच आणि प्रेक्षागृह अशा विभागणीतून निर्माण झालेल्या अवकाशात नाटक ताल धरते, नाटकाचा हा परिचित ‘फॉर्म’ एका नाट्यकृतीने पूर्णत बदलला आहे. कलावंत आणि रसिक यांच्यात असणारे अंतर पुसून टाकत या नाटकाने रसिक जनांना थेट या नाटकाचाच भाग केले आहे. हे नाटक आहे ‘काजव्यांचा गाव’! या नाटकाने रंगमंचीय अवकाशाचा संपूर्ण ढाचा बदलून टाकला आहे. नाट्य मंचित करण्याची रूढ पद्धत बदलत, हा ‘प्रयोग‘ रसिकांना थेट नाटकात सामावून घेत सादरीकरणाचा अफलातून अनुभव देतो.

काजव्यांच्या या गावाच्या फेरफटक्याला प्रारंभ होतो तोच मुळी रसिकांसाठी निर्माण केलेल्या बैठकीतून! हे नाटक अनुभवताना रसिकही नाटकाच्या नेपथ्यात अलगद एकरूप होऊन जातात. थेट नाटकातच रसिकांचे अस्तित्व प्रस्थापित करत त्यांच्या सभोवतीच हे नाटक घडत जाते. विशेष म्हणजे यालाच अनुसरून रसिकांच्या बैठकीतूनच यातल्या कलावंतांच्या होणाऱया ‘एन्ट्री’ आणि ‘एक्झिट’ या नाटकाला अनोखे परिमाण प्राप्त करून देतात. अशा पद्धतीने मंचित होणारे हे नाट्य रंगकर्मी प्रदीप वैद्य यांच्या संकल्पनेतून उतरले आहे. प्रायोगिक नाटकांत रमणाऱया रसिकांना नाटकाचा असा ‘फॉर्म’ जरी परिचित असला तरी सर्वसाधारण रसिक वर्गासाठी ही एक नावीन्याची गोष्ट आहे.

कोकणातल्या दीक्षित कुटुंबात या नाटकाचे कथानक फुलते. या कुटुंबातल्या व्यक्तींचे मनोविभ्रम टिपत त्यांचे एकूणच जगणे हे नाटक समोर ठेवते. या कुटुंबातल्या आजींचा सहस्रपूर्ण चंद्रदर्शन सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने हे कुटुंब कोकणातल्या वडिलोपार्जित घरात एकत्र आले आहे. आजी, आप्पा, ताई, भाऊ, प्रतिभा, शांता, वसुधा, श्वेता, चिन्मय, गणेश, मीना, दीपा, कासीम, गडकरी, गुरुजी आदी पात्रांच्या माध्यमातून उलगडत जाणारी ही गोष्ट आहे. या पात्रांमध्ये घडणाऱया संवादांतून हे नाटक रंगत जाते. नाटकातल्या या कुटुंबातली पात्रे महत्त्वाची आहेतच; पण त्याचबरोबर जुन्या काळाचे भान राखत त्या पिढीच्या आठवणी, वस्तू आणि संदर्भांची वीण या नाटकाने जपली आहे. अगदी नाटकात वापरलेल्या साधनसामग्रीनेही यात मोलाची भर घातली आहे. नाटकातली ठिपक्यांची रांगोळी, सूप, टोपल्या, काथ्या, आमसूल, वाळवण आदी चीजा अस्सल गावरान अनुभूती देतात. अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे नाटकात वापरलेला प्रकाश! हा प्रकाश आहे तो जुन्या काळात घरात वापरल्या जात असलेल्या काचेच्या कंदिलांचा. या कंदिलांच्या प्रकाशात या नाटकाचा चेहरा अधिकच खुलून आला आहे.

या नाटकासाठी प्रेक्षागृह वेगळा नसल्याने रसिकांच्या संख्येवर मर्यादा आहे. साधारण पन्नास ते साठ जणांच्या उपस्थितीत हा प्रयोग रंगतो. नाटक घडते ते 180 अंशाच्या कोनात. त्यामुळे रसिकांना माना वळवून यातला नाट्यरस शोषता येतो आणि त्यात वेगळीच गंमत आहे. यातली पात्रे रसिकांच्या आजूबाजूलाच वावरत असल्याने त्यांच्या चेहऱयांवरचे भाव अगदी जवळून टिपता येतात. नाटकाची गोष्ट हा अजूनच वेगळा अनुभव आहे. प्रदीप वैद्य यांनी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत अशी जबाबदारी या नाटकासाठी सांभाळली आहे. हा ‘सबकुछपणा’ गरजेचाच होता. कारण त्यांच्या संकल्पनेतून उतरलेला हा प्रयोग सादर करताना त्यात एकतानता असणे तितकेच आवश्यक होते. या नाटकाचा संपूर्ण ‘फॉर्म’ वेगळा असल्याने नाटकाच्या तांत्रिक बाजूंची गरजही वेगळी आहे आणि त्याचे अचूक व्यवधान राखत हा ‘काजव्यांचा गाव’ उभा राहिला आहे.

स्मिता तावरे यांची वेशभूषा आणि आशीष देशपांडे यांची रंगभूषा या नाट्याचा आशय उठावदार करणारी आहे. आरती गोगटे, रूपाली भावे, आशीष वझे, मधुरा गोडबोले, सागर यार्दी, वैभवी आफळे-साबणे, दीपाली जांभेकर, समृद्धी मोहरीर, यश पोतनीस, मुक्ता सोमण, धनश्री लेले, सौरभ मुळे, अवनीश कलकेरी, समीर जोशी, गंधार साळवेकर आदी कलावंतांनी काजव्यांच्या गावाची ही सफर लक्षणीय केली आहे. एकूणच, ‘एक्स्प्रेशन लॅब’ प्रकाशित हा ‘काजव्यांचा गाव’ नाट्याचा अवकाश लख्ख उजळून टाकणारा आहे.
[email protected]