
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुंबईच्या प्रश्नावरून राडा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून शिवसेनेचे आमदार मिंधे सरकारच्या नाकीनऊ आणण्यासाठी सज्ज झालेले आहेत. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा त्यात प्रमुख राहणार आहे. धारावी एकाच व्यक्तीला आंदण देण्याच्या निर्णयावरून शिवसेनेचे आमदार सरकारला घेरणार आहेत.
नागपूर येथे उद्या, गुरुवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे आमदार मुंबईच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडतील, अशी माहिती शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली. मुंबईतील विकासकामे, प्रकल्प आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी शेतकऱयांचा मुद्दा गाजणार आहे. शेतकऱयांच्या कापूस, सोयाबीन, धानाला भाव नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत सरकार शेतकऱयांबरोबर ज्या पद्धतीने वागतेय ते दुर्दैवी आहे, असे सुनील प्रभू म्हणाले. बेरोजगार, शिक्षक, कामगारांचेही प्रश्न आहेत. रुग्णालयांमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत आहेत. यावरूनही आम्ही सरकारला घेरणार आहोत, असे प्रभू म्हणाले.
चौकशी कराच…दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कथित घोटाळय़ाची यादी बाहेर काढण्याची धमकी सत्ताधाऱयांकडून दिली जात आहे. त्याबाबत सुनील प्रभू म्हणाले की, कोणत्याही मुद्दय़ावर चौकशी करा, दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ दे.
धारावी एकाच व्यक्तीच्या घशात घालू देणार नाही
या अधिवेशनात शेतकऱयांच्या मुद्दय़ांवर आम्ही बोलूच, पण मुंबईच्या बाबतीत जे जे घडतेय त्यावर आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराही प्रभू यांनी दिला. धारावी एकाच व्यक्तीच्या घशात घालण्याचे सरकारचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही प्रभू यांनी दिला.
मिंधे सरकारमध्ये कोणाचाही कोणाला ताळमेळ नाही, कोणत्याही मुद्दय़ावर एकमत नाही. मंत्र्यांमध्ये आपसात भांडणे होत आहेत. परस्परविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. कोणी कोणाबद्दल काय वक्तव्ये केली ते अत्यंत कल्पकरीत्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेच्या स्थळी ‘कोण कोणास म्हणाले’ या शीर्षकाखाली बॅनर्सच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. टोपण नावांनी लावण्यात आलेली ही वक्तव्ये लक्षवेधी ठरली होती.
सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी….हे महादेवा मला मंत्री करा – गोगो मास्टर (भरत गोगावले)
मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला तेव्हा नेमला अजितदादांना डेंग्यू झाला – रामाचे दास (रामदास कदम)
आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, नो डोस्कस, करायचे म्हणजे करायचे, मी सांगेन तेच करायचे – बाळ तानाजी (तानाजी सावंत)
मला शिंदेंसोबतचा भाजप आवडत नाही, मला अजितदादांसोबतचा भाजपही आवडत नाही, मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो – अधीर भाऊ (सुधीर मुनगंटीवार)
ओबीसी मुद्दय़ावरून बोलायचे असेल तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावल बोलावे – राधाकिशन भाऊ (राधाकृष्ण विखे-पाटील)
अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिलू आहे, अजित पवारांना आम्ही मानत नाही – चंदगोपी (गोपीचंद पडळकर)
मीच मुख्यमंत्री – एकनाथ
मला मुख्यमंत्री व्हायचे आहे – अजित
देवाभौच होणार मुख्यमंत्री – बावनकुळे
























































