
>> डॉ. मुकुंद कुळे
सध्याच्या जमान्यात आपला खरा चेहरा लपवण्यासाठी माणूस क्षणाक्षणाला खोटा मुखवटा धारण करत असतो. मात्र हा मुखवटा अदृश्य स्वरूपात असतो. अर्थात, एखाद्या कसोटीच्या क्षणी हे अदृश्य मुखवटे गळून पडतात. परंपरेने चालत आलेले मुखवटे मात्र असे गळून पडत नाहीत. पिढय़ान्पिढय़ा त्यांचं अस्तित्व कायम टिकून राहतं. कारण हे मुखवटे केवळ आभासी नसतात. त्यांच्यामागे मानवी धारणा आणि प्रेरणांचा वाहता प्रवाह असतो. त्यामुळेच मानवाच्या आदिम अवस्थेत निर्माण झालेली मुखवटय़ांची परंपरा आजही कायम आहे.
आज घराच्या भिंतींवर केवळ सजावटीसाठी म्हणून टेराकोटाचे, विविध धातूंचे मुखवटे लटकवलेले दिसतात, परंतु परंपरेने चालत आलेले मुखवटे कधीच निर्हेतुक नसतात. त्यांची निर्मिती ही कायम सहेतुकच असते. मुखवटय़ांचा इतिहास इसवी सनाच्या अडीच हजार वर्षांच्या आधीपासूनचा आहे. त्या काळातील मानवाने गुहांमधील भिंतींवर काढलेली मुखवटय़ांची चित्रं आजही पाहायला मिळतात. प्रत्यक्ष मुखवटय़ांचा वापर मात्र मानवाने आपल्या आदिम अवस्थेतच सुरू केला होता. हे मुखवटे म्हणजे त्यांच्या जगण्याचा एक भाग होता. तेव्हा मानवाला निसर्गातील अनेक गोष्टींचं आकलन झालेलं नव्हतं. पाऊस, पाणी, वारा यांच्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन त्यांना ठाऊक नव्हता. मात्र त्यामुळे आपल्या आयुष्यावर बरावाईट परिणाम होतो हे त्यांना अनुभवाने ठाऊक झालं होतं. त्यामुळे त्याने त्या त्या निसर्गतत्त्वाचे प्रतीकात्मक मुखवटे तयार केले. हे मुखवटे धारण करूनच मग तो त्या तत्त्वांची आराधना करू लागला आणि मुखवटय़ांची प्रथा सुरू झाली.
मानवाच्या आदिम काळात सूर्यदेव, पाऊसदेव, हिरव्यादेव (निसर्ग) अशा निसर्गातील अनेक तत्त्वांचे मुखवटे तयार झाले. मात्र या सुष्ट म्हणजे चांगल्या देवतांबरोबरच आपल्याला ज्या गोष्टींचं भय वाटतं अशा दुष्ट शक्तींचेही मुखवटे आदिमानवाने तयार केले. अनेक आदिवासी जमातींमध्ये अद्यापि अशा सुष्ट-दुष्ट देवतांचे मुखवटे पाहायला मिळतात. ‘मुखवटा’ हा शब्द ‘मुख’ आणि ‘वटा’ या दोन शब्दांपासून बनलेला आहे. ‘मुख’ म्हणजे चेहरा आणि ‘वटा’ म्हणजे छाप. म्हणजेच चेहऱयाची छाप असलेला तो मुखवटा! आदिम समाजात निर्माण झालेली मुखवटा संस्कृती आजही संपूर्ण जगात विविध रूपांत टिकून आहे. मात्र हे मुखवटे कुणाचे, कधी आणि कुठल्या प्रसंगी वापरले जातात त्यावरून त्यांचीही विविध प्रकारांत विभागणी झालेली आहे. कारण मुखवटे धारण करण्यामागेही प्रत्येकाचं प्रयोजन वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ, सण-उत्सवप्रसंगी घालायचे मुखवटे, धार्मिक विधिविधानांच्या वेळी घालायचे मुखवटे, मनोरंजनपर कार्यक्रमात घालायचे मुखवटे वगैरे.
मुखवटय़ांचा सगळ्यात जास्त वापर आजही आदिवासी समाजातच केला जातो. विशेषत धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी आदिवासी समाज या मुखवटय़ांचा मनसोक्त वापर करतो. कारण हे मुखवटे म्हणजे आदिवासींच्या जगण्याचा भाग असतात. मुखवटय़ांचा वापर म्हणजे त्यांच्यासाठी विशिष्ट संकेत असतो. म्हणूनच महाराष्ट्रातले वारली, ठाकर, डोंगरकोळी, कोलाम, कोरकू, गोंड असे सर्व आदिवासी समाज त्या त्या प्रसंगी मुखवटय़ांचा वापर आवर्जून करतात. विदर्भात दिवाळीच्या आधी काही दिवस दंडारनृत्याला सुरुवात होते. भाऊबीजेपर्यंत पाडय़ापाडय़ांवर रोज रात्री दंडारनृत्य रंगतं. मात्र जेव्हा हे नृत्य पहिल्यांदा सादर केलं जातं, तेव्हा हे नृत्य म्हणजे कोलाम आणि गोंड समाजासाठी तो एक धार्मिक विधी असतो. कारण पहिल्या दिवशी या नृत्यात खोडय़ाळ या मुखवटय़ाच्या आधारे प्रत्यक्ष त्यांचा लिंगाळ देवच नाचत असतो. त्यामुळे मुखवटय़ाची रीतसर पूजा करूनच खोडय़ाळ हा मुखवटा चेहऱयावर चढवला जातो. दंडार नाचायला सुरुवात करण्याआधी देवाच्या समोर खोडय़ाळ हा मुखवटा ठेवला जातो. चार पुरुष साडी नेसून ते खोडय़ाळभोवती आडोसा तयार करतात. कारण हा पूजाविधी इतर कुणी पाहायचा नसतो. फक्त समाजाच्या भगतालाच इथे प्रवेश असतो. भगत तिथे येऊन खोडय़ाळला पाच चिमण्यांचा बळी देतो. हा बळी दिल्यावर उपस्थित असलेल्यांपैकीच कुणाच्या तरी अंगात येतं. ज्याच्या अंगात येतं, त्याच्या चेहऱयावरच खोडय़ाळचा मुखवटा चढवला जातो आणि मग दंडारनृत्याला सुरुवात होते.
दंडारमध्ये श्रद्धाभाव मनात ठेवून खोडय़ाळचा मुखवटा चेहऱयावर चढवला जातो, परंतु गावबांधणीच्या कार्यक्रमात मात्र मनोरंजनाचा हेतू मनात ठेवूनच आदिवासी समाज प्राण्यांचे-माणसांचे विविध मुखवटे घालतो. मे महिन्यात पार पडणारा गावबांधणीचा कार्यक्रम म्हणजे गोंड-कोलामांचा एक सामाजिक विधीच असतो. या दिवशी गावातील देवाची पूजा करून आदिवासी समाज आपल्या गावाच्या चतुःसीमा बांधून घेतो. गावात कुठलीही रोगराई येऊ नये, कुठलं संकट येऊ नये म्हणून करायचा हा विधी असतो. गावाच्या सीमा बांधून झाल्यावर आदिवासी पुन्हा गावात येतात आणि मुखवटे घालून मनसोक्त नाचतात.
आदिवासी समाजात कुठलाही मुखवटा धारण करताना देवाची आणि मुखवटय़ाची आधी पूजा केली जाते. त्यासाठी चिमणी, कोंबडा किंवा बोकडाचा बळी दिला जातो. कारण हा बळी दिल्यामुळे ज्याचा मुखवटा असेल, तो देव वा प्राणी प्रत्यक्षात मुखवटय़ात वास करतो, अशी आदिवासी समाजाची धारणा आहे. कुणाचाही मुखवटा घालताना आदिवासी समाजाच्या भावना अतिशय तीव्र असतात. कारण त्यांच्यासाठी मुखवटा निर्जीव कधीच नसतो. किंबहुना, मुखवटय़ाच्या माध्यमातून ते नवा जीव धारण करत असतात.
केवळ महाराष्ट्रच नाही, देश व जगभरातल्या आदिवासी समाजात मुखवटय़ांची ही रूढीपरंपरा अजून जिवंत आहे. आपली संस्कृती म्हणून त्यांनी मुखवटय़ांची परंपरा जोपासलेली आहे. पूर्वी आदिवासी समाज आपल्या घरात मृत्यू पावलेल्या प्रत्येक पूर्वजाचे मुखवटे करून ते आपल्या घरात ठेवत असे. तसंच मृत्युविधींच्या वेळी मृतात्म्याने त्रास देऊ नये म्हणूनही पूर्वी भगत वगैरे मंडळी मुखवटे घालत असत. मात्र आता ही पद्धत बंद झालेली आहे.
मुखवटय़ांची परंपरा जगभर सर्वत्रच आहे. हे मुखवटे माणूस आपल्या चेहऱयावर धारण करतो. या मुखवटय़ांमध्ये पशुपक्ष्यांबरोबरच विविध देवदेवतांचेही मुखवटे असतात आणि ते धारण करताना मुखवटय़ांबद्दल प्रत्येकाच्या मनात पूज्यभावच असतो. मग तो मुखवटा बिहारच्या छाऊ नृत्यातील रामाचा असो किंवा रामलीलेतील रावणाचा. आदिवासी समाजानंतर मुखवटय़ांची परंपरा ठिकठिकाणच्या लोककला प्रकारांनीच जपली आहे. उत्तरेत ती प्रामुख्याने रामलीला सादर करणाऱयांनी जपली आहे. कारण रामलीलेत रावणाच्या दहा तोंडांच्या मुखवटय़ांपासून जटायू, जांबुवंत, मारुती अशा अनेकांचे मुखवटे वापरले जातात. रामलीलेत वापरले जाणारे मुखवटे म्हणजे त्या-त्या कलाकारांसाठी खरेखुरेच असतात. त्यामुळेच जेव्हा एखादा कलावंत जटायू वा मारुतीचा मुखवटा धारण करतो, तेव्हा तो तना-मनाने रामभक्त जटायू आणि मारुतीच असतो. ही किमया रामायणातील पात्रांची असतेच, पण मुखवटे धारण करण्याआधी त्या-त्या मुखवटय़ाच्या केलेल्या पूजेचीही ही किमया असते.
रामलीलेप्रमाणे लोककलांमध्ये मुखवटे वापरण्याची परंपरा महाराष्ट्रात मोठी आहे. कारण महाराष्ट्रात दशावतार, नमन, बहुरूप्यांचा खेळ, सोंगी भारूड अशा विविध कला प्रकारांत मोठय़ा प्रमाणावर मुखवटे वापरले जातात. भारुडांत बैल, भूत, रेडा अशा मोजक्याच पात्रांचे मुखवटे वापरले जातात. मात्र कोकणातील प्रसिद्ध लोककला असलेल्या नमन या लोककला प्रकारात मुखवटय़ांची मोठी विविधता पाहायला मिळते. नमनात गणपती, संकासुर असे देवदेवतांचे मुखवटे असतातच, पण स्थानिक परिसरात प्रसिद्ध असलेल्या भुताखेतांचे आणि माणसांचे मुखवटेही असतात.
सामाजिक-धार्मिक कार्याप्रसंगी कलाकार मंडळी चेहऱयावर चढवत असलेल्या मुखवटय़ांचं महत्त्व आजही शाबूत आहे. मग ते मुखवटे मातीचे असो, लगद्याचे असो, नाहीतर देवांचे सोन्या-चांदी-पितळेचे असो, ते वापरण्याचं प्रयोजन काहीही असलं तरी मुखवटा ही त्या-त्या समाजाची, कलाकारांची सामाजिक-धार्मिक आणि सांस्कृतिक गरज आहे. ते त्यांचं व्यक्त होण्याचं सशक्त साधन आहे.
आदिम काळात आपल्या व्यक्त होण्याच्या गरजेतून आदिमानवाने मुखवटय़ांचा शोध लावला. मुखवटय़ांचं तेच प्रयोजन आजही कायम आहे आणि मुखवटय़ांची तीच खरी ताकद आहे!





























































