
नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आज गोरेवाडा येथील जंगलाजवळ ‘एसएलआर’ रायफलची तब्बल 156 जिवंत काडतुसे सापडली आहेत. यामागे नक्षली ‘कनेक्शन’ आहे का या दिशेने तपास केला जात आहे.काटोल रस्त्यावर गोरेवाडा जंगल परिसरात नाल्याजवळ असलेल्या एका पिशवीत ही काडतुसे सापडली. एसएलआर रायफलचा वापर फक्त पोलीस आणि निमलष्करी दल करतात. घटनास्थळापासून शहर पोलीस मुख्यालय काही अंतरावर आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या गोळ्या पोलिसांनी वापरलेल्या रायफलमधील आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे.























































