तुझसे नाराज नही जिंदगी…गाण्याचे गायक अनुप घोषाल यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गायक-संगीतकार अनुप घोषाल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे

पीटीआयच्या वृत्तानुसार, अनुप घोषाल अनेक दिवसांपासून वाढत्या वयानुसार येणाऱ्या आजारांनी त्रस्त होते. कलकत्ता येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी दुपारी 1.40 वाजता शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

अनुप घोषाल प्रसिद्ध गायक संगीतकार होते. त्यांचा जन्म 1945 मध्ये अमुल्य चंद्र घोषाल आणि लाबन्या घोषाल यांच्या घरी झाला. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यांनी पहिल्यांदा ऑल इंडिया रेडिओवर मुलांच्या कार्यक्रम शिशु महलसाठी गाणे गायले होते. त्यांचे ‘मासूम’ सिनेमातील ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ हे गाणे आयकॉनिक ठरले. त्यांनी ‘हुस्न भी आप है, इश्क भी आप है’ आणि ‘शीशे का घर से तुम साथ हो जिंदगी भर के लिए’ ही गाणी गायली आहेत. हिंदी, बंगाली बरोबरच त्यांनी अन्य भाषेतही गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.