चिरतरुण अनिल कपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रिया भोसले

सध्या बहुचर्चीत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातले रणबीर कपूर, बॉबी देओल यांचं नाव जितकं गाजत आहेत तितकेच वडिलांच्या भुमिकेतल्या अनिल कपूरची ही गाजणारी भुमिका बघून आणि सिनेमातला त्याचा थक्क करणारा जोश बघून बरोब्बर चार दशकापूर्वी म्हणजेच 1983 साली आलेला त्याचा पहिला चित्रपट वो सात दिन आठवला. त्याप्रमाणे ‘एक बार कहो’ मधल्या नायकाच्या मित्राचा रोल किंवा संजीव-राखीच्या ‘हमारे तुम्हारे’ चित्रपटताल्या सात मुलांपैकी एक मुलगा असा अनिल कपूरचा प्रवास ‘वो सात दिन’ येण्याआधी माहीत होता. इतर कुणी लक्षात राहिले नाही तरी अनिल कपूर आणि त्याचा अभिनय लक्षात राहण्यासारखाच होता. सिनेमात यायची त्याला इतकी घाई होती कि बोनीच्या ‘वो सात दिन’ येईपर्यंत हि त्याला थांबता आलं नाही. काही मिनिटांचा ‘शक्ती’ मधला रोल हि त्याच घाईचा परिपाक होता.धरमच्या क्रोधीतला सचिनच्या रोलसाठी आधी त्याची निवड झाली होती,ऐनवेळी घईंनी सचिनला घेतलं नाहीतर सचिनऐवजी ‘चल चमेली बाग में’ गाण्यात अनिल दिसला असता.

‘वो सात दिन’ च्या आधी बोनी ‘हम पाँच’ची निर्मिती करत होता.अनिलची त्यात काम करायची इच्छा होती पण बोनीला,आपल्या भावाला पाच मित्रांपैकी एकाचा रोल देण्याऐवजी नायक म्हणून पेश करायचं होतं. ‘वो सात दिन’ च्या पटकथेची ताकद बोनीने ओळखली होती,त्याचा अंदाज चुकला नाही.मराठी मुलगी हरयाणवी मुलाच्या प्रेमात पडते. त्यातल्या गमतीजमती ते लग्नानंतर आलेला ट्विस्ट त्यामुळे ‘वो सात दिन’ सुपरहिट झाला आणि प्रेमप्रताप पटियालावाला अनिल कपूर एका रात्रीत स्टार!

‘वो सात दिन’ नंतर थेट मशालमध्ये नवोदित कलाकाराच्या अभिनयाचा कस लागेल किंवा धज्जिया उडतील अशा दिलीप कुमारसमोर अभिनय करायची अनिल समोर आव्हान होते. आलेली संधी अनिलने लीलया पेलली. अनिलची भूमिका अगोदर यश चोप्राने अमिताभला त्यानंतर कमलहसनला आॅफर केली होती. दोघांनी नकार दिल्यानंतर चोप्रानी अनिल कपूरला संधी दिली. गंमत बघा, ‘वो सात दिन’ आधी ज्या शक्तीत दिलीप कुमारसोबत तो काही मिनिटासाठी पाहुणा कलाकार म्हणून चमकला त्याच दिलीपसाबसमोर मशालमध्ये पूर्ण लांबीचा रोल मिळवला. अनिलचे दिवस पालटले होते.चक्क मशालसाठी बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टरचा त्या वर्षीचा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवला. तो काळ त्याने स्वतःच्या नावावर करुन टाकला होता.हिंदी चित्रपटात आवश्यक असणारा सगळा मसाला आणि अनिल कपूर हा हुकमी एक्का हे रसायन बनले होते.

‘मेरी जंग’ नंतर 1988 ला आलेल्या ‘तेजाब’ने तर इतिहास रचला.पहिला बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार अनिलने ‘तेजाब’ साठी पटकावला. अनिलचं नशिब चांगलं कि चांगल्या नशिबासोबत बोनीसारखा चांगला भाऊ ही मिळाला.ह्याच बोनीमुळे करीयरला चार चाँद लावणारा एन.चंद्राचा तेजाब मिळाला होता.नाहीतर चंद्रा आदित्य पंचोलीला घेणार होते.तेजाबला केवळ बोनी म्हणाला म्हणून अनिलने होकार दिला.पण शुटींगसाठी तारखा दिल्या नव्हत्या .सुरु असलेल्या फिल्मचं शुटींग कॅन्सल झालं कि त्यादिवशी तेजाबचं शुटींग पार पडायचं.असा मजबूत जुगाड केलेला तेजाब अनिल कपूरच्या सिनेकारकिर्दीतला माईलस्टोन ठरला.ह्यामागे भाऊ बोनीची पुण्याई होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये. पदार्पणातला वो सात दिन असो किंवा अनिलला इंडस्ट्रीत नंबर वन पोझीशन मिळवून देणारा मि.इंडिया असो बोनी नेहमीच भावासाठी उभा राहीला. शेखर कपूरच्या दिग्दर्शनात ‘मि.इंडिया’ सारख्या सिनेमाने १९८६ साल तुफान गाजवलं. अमिताभच्या अपयशी सिनेमांनंतर सुपरस्टारचं रिकामं झालेलं स्थान मिस्टर इंडियामुळे आरामात अनिलच्या नावावर झालं. ‘तेजाब’, ‘रामलखन’ने त्या स्थानावर शिक्कामोर्तब केलं.टोटल मसाला पिक्चर्स, अँक्शन,गाणी,अभिनय अशा सगळ्याची जबाबदारी घेत दुसरया कोणत्या हिरोसोबत स्क्रीन न शेयर करता अनिल कपूरने एकापेक्षा एक असे सुपरहिट चित्रपट फक्त एकट्याच्या हिंमतीवर दिले.ह्या मसाला चित्रपटात अपवाद फक्त साहेब आणि ईश्वरचा..साहेब अनिल कपूरच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम सिनेमा म्हणता येईल.स्वार्थी कमवत्या भावांचा निकम्मा भाऊ,वेळ आल्यावर स्वतःची किडनी विकून बापाचं टेन्शन कमी करणारा जबाबदार मुलगा साहेब,अनिलने मध्यमवर्गीय मुलाच्या भुमिकेत जान ओतली. उत्पल दत्त,राखी सारख्या अभिनयात श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या कलाकारांसोबत अनिलने काय अभिनय केला.किडनी विकून उत्पल दत्तच्या हातात पैसे दिल्यावर चोरी केली असणार विचार करुन मारणारया बापाचा मार खात त्याने जे एक्सप्रेशन्स दिलेत ते बघा.उत्पल दत्त आणि अनिल कपूरचा हा सीन कोणत्याही दमदार संवादाशिवाय फक्त एक्सप्रेशन्सवर भाव खाऊन गेलाय.

असाच संयत अभिनय महेश भट्टच्या ‘ठिकाना’ मध्येही केलाय.समोर साक्षात स्मिता पाटील आणि रोहिणी हट्टंगडी होत्या.अनिलने कुठेही त्यांना आॅव्हरपावर करायचा प्रयत्न न करता हि आपली भुमिका लिलया साकारली.

त्याच्या ईश्वरमधल्या कॅरेक्टरवर राज कपूरची छाप असल्याचा आरोप जरी अगदीच निराधार नसला तरी अनिलची ती भुमिका लोकप्रिय झाली.लोकांना तुम्ही अनुकरण करता ह्यात रस नसतो.त्या भुमिकेत तुम्ही प्राण ओतलात आणि चपखल बसत असाल तर तर प्रेक्षक स्विकारतातच. ‘ईश्वर’ बाबतीत तसंच घडलं.अनिल कपूर म्हणजे ‘ईश्वर’ हे समीकरण इतकं घट्ट बसलं कि कि नंतर आलेल्या ‘बेटा’मध्येही थोडी ईश्वरची झाक दिसतेच. ऐंशीच्या मारधाड सिनेमांच्या दशकात त्याने बरयाच विविधांगी भुमिका केल्या.सरप्राईझ द्यायला आवडत असावं त्याला कारण ‘बेटा’ नंतर तशाच टाईपच्या भुमिकांची वाट बघणाऱ्यांना त्याने मिशी काढून, केसांना पांढरा रंग लाऊन ‘लम्हे’ तला कुंवर विरेंद्रप्रतापसिंग बनून झटका दिला. ‘लम्हे’ यश चोप्रांचा काळाच्या पुढचा सिनेमा होता.जिच्यावर प्रेम केलं तिच्याच मुलीसोबत लग्न करणारा हिरो प्रेक्षकांनी बाॅक्स आॅफिसवर जरी नाकारला तरी ‘लम्हे’ हा अनिल आणि श्रीदेवीचा नितांत सुंदर सिनेमा होता हे कुणीही मान्य करेल. तरुण वयातला पल्लवीवर जीव टाकणारा निरागस मुलगा ते वयाने अनुभवसमृद्ध वृद्ध अशा भुमिका रोज मिळत नाहीत.ह्यातूनच नेहमीपेक्षा वेगळं करण्याचा अनिल कपूरचा ध्यास दिसून येतो.मग ते ‘चमेली कि शादी’ मधला भोळाभाबडा चरणदास असो, ‘रामलखन’ मधला खोडकर लखन असो, ‘लज्जा’ मधलं बिस्किटं खाऊ घालणारा चांगल्या मनाचा चोर असो किंवा 1942 a love story मधला देशासाठी इंग्रजांशी बगावत करणारा नरेन्द्रसिंग असो..अनिल कपूर कायम ते कॅरेक्टर बनून लक्षात राहीला.

याच दरम्यान त्याला नायक, ‘विरासत’, ‘बुलंदी’ सारख्या हि गंभीर थाटाच्या भुमिका करायला मिळाल्या.’बुलंदी’ मध्ये समोर थलैव्वा रजनीकांत असूनही त्याने आपली छाप पाडली.दिलीप कुमार , रजनीकांत ,स्मिता पाटील,रोहीणी हट्टंगडी,उत्पल दत्त सारख्या दिग्गजांसमोर ज्या आत्मविश्वासाने त्यांने अभिनय केलाय ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

1983 सालच्या ‘वो सात दिन’ मधल्या पद्मिनी कोल्हापुरेचा नायक पासूनचा प्रवास ते आजच्या, 2023 च्या ‘थँक्यु फॉर कमिंग’ मध्ये भुमी पेडणेकरसोबत अफेयर करणारा अनिल कपूरचा वय वाढलेला नायक आणि त्याचसोबत ‘अॅनिमल’मध्ये रणबीर सिंगच्या बापाची भुमिका..तो आपली सेकंड इनिंग जोरशोरसे करण्यात कमालीचा यशस्वी ठरलाय.अर्थात त्याचं श्रेय सिनेमावर असणारं आत्यंतिक प्रेम,त्याची मेहनत आणि स्वतःची तब्येत राखून ठेवणारया सवयीला जातं.त्याची जितकी सिनेकारकिर्द गाजली तितकंच त्याचं वय, त्याचं चिरतरुण असणं हि गाजलं.त्याचा झकास शब्द गाजला आणि आता ‘अॅनीमल’ मधला बापही गाजतोय.त्याने साकारलेल्या बापाची भुमिका असलेल्या ‘दिल धडकने दो’,’एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ आणि ‘अॅनिमल’ बघा, हिरोइतकंच त्याचं अस्तित्व तोलामोलाचं बघायला मिळेल.

अॅनिमलच्या निमित्ताने रणबीर कपूर, अनिल कपूरबद्दल गंमतीत म्हणाला होता, अनिल कपूरच्या बायोपिकमध्ये अनिल कपूर स्वतः काम करेल इतका तो फिट आहे.किती खरयं ते, आज त्याचे समकालीन हिरो रूपेरी पडद्याआड गायब झालेले असताना हा मात्र अजूनही दुसरया पिढीच्या कलाकारांसोबत ‘रेस’मध्ये दिसत आपण लंबी रेस का घोडा आहोत सिद्ध करतोय.आगामी हृतिकच्या ‘फायटर’मध्ये शेर खुल गये गाण्यात दिसलाय आणि फक्त दिसत नाही तर कसला भारी दिसतोय..बघाच

पुतण्या अर्जुन कपूरने त्याचा एक किस्सा सांगितला होता,अनिल कपूर नेहमी घरातल्या मुलांची स्तुती करतो जेणेकरून त्याला त्याची स्तुती ऐकायला मिळावी. माणसं स्वप्रेमात असली कि ती इतरांच्या डोक्याला ताप असतात,अपवाद अनिल कपूरचा,त्याच्यासारखी लोकं स्वप्रेमातून काळानुसार बदल घडवत स्वतःला ‘झकास’ करत प्रेरणा देतात!फक्त इतरांनाच नाही तर

“लिऐ सपने निगाहों मे
चला हू तेरी राहो में जिंदगी आ रहा हू मैं” म्हणत जिंदगीला ही त्याच्यासोबत चिरतरुण रहायची प्रेरणा देतात.

(लेखिका या चित्रपट समिक्षक आहेत)