झोपडपट्टी स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमल्याने गरीबांचा रोजगार जाणार, 3 महिन्यांत कार्यवाही पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या झोपडपट्टय़ांमध्ये सामाजिक संस्थांकडून होणारे स्वच्छतेचे कामही आता कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी येत्या दोन ते तीन महिन्यांत  कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून घरोघरी कचरा जमा करण्यापासून ते नालेसफाईपर्यंतची सर्व कामे एकाच कंत्राटदाराला दिली जाणार आहेत. स्वच्छतेचे काम परिणामकारकरीत्या होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले, मात्र या या निर्णयामुळे सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या गोरगरीबांच्या हातचा रोजगार मात्र जाणार आहे.

मुंबईच्या एकूण वस्तीपैकी सुमारे 50 टक्के वस्ती झोपडपट्टी भागात आहे. मुंबईत झोपडपट्टय़ांच्या स्वच्छतेसाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान सुरू करून सामाजिक संस्थांना घरोघरी कचरा जमा करण्याचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आर्थिक गरजेतून निर्माण झालेल्या गोरगरीबांच्या या संस्थांच्या सदस्यांना रोजगाराची संधीही मिळाली. याशिवाय या कामामुळे झोपडपट्टय़ांमधील कचऱ्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत झाली. मात्र ही योजना आता परिणामकारक नसल्याच्या तक्रारी येत असल्याचा पालिकेचा दावा आहे. त्यामुळे सर्वसमावेशक उपक्रम राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत पालिकेची अनेक कामे कंत्राटदार, खासगीकरणातून होत असताना आता स्वच्छतेचे कामही कंत्राटदाराच्या माध्यमातून होणार असल्यामुळे गोरगरीबांचा रोजगार जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

पालिका म्हणते…

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी संपूर्ण विभाग-झोपडपट्टीची जबाबदारी एकाच कंत्राटदारावर सोपवली जाईल. झोपडपट्टीतील नाल्यांची स्वच्छता, घरोघरी कचरा जमा करणे आणि स्वच्छतेबाबतची पुढील आवश्यक कार्यवाही त्यांच्याकडून केली जाईल. यात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदाराला जाब विचारणेही शक्य होईल. त्यामुळे झोपडपट्टय़ांची स्वच्छता परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. तर आगामी काळात जनजागृतीसाठी मोठय़ा प्रमाणात काम करून कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. आगामी दोन ते तीन महिन्यांत झोपडपट्टय़ांमध्ये याचा परिणाम दिसू लागेल, असेही ते म्हणाले.