मुद्दा – आदिवासींचा आधारवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मनमोहन रो. रोगे

जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले ।
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।।

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील या दोन ओळीत त्यांनी साधुसंत आणि देवमाणसं ओळखण्याची किती सोपी पद्धत सांगितलेली आहे! या काव्यपंक्तींना व्रत मानून आयुष्यभर रंजल्यागांजल्यांची, दीनदुबळ्यांची, वनवासी आदिवासींची सेवा करणे, त्यांना स्वच्छता, आरोग्य, शिक्षण इत्यादींचे महत्त्व पटवून त्यांच्यासाठी दवाखाने – रुग्णालय सुरू करून त्यांची मोफत सेवा करणे, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देऊन त्यांचे व पुढील पिढय़ांचे राहणीमान उंचावणे, त्यांना सुसंस्कृत नागरिक बनवण्याचे काम 60 वर्षाहून जास्त काळ अखंड सुरू ठेवणे. या वनवासी माणसांनी कधी भेट म्हणून दिलेल्या जंगली जनावरांची, तर काही जनावरांच्या अनाथ पिल्लांची सेवाशुश्रूषा करून त्यांना जगवणे अशी डॉ. प्रकाश आमटे यांची जगावेगळी कार्ये पाहिल्यास संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या त्या ओळी त्यांच्यासाठी अगदी चपखल बसतात हे लक्षात येईल. जे आदिवासी माणूस असूनही जंगलात प्राण्यांसारखे राहत होते, जंगली प्राण्यांची शिकार करून खात होते, तर कधी स्वतः प्राण्यांची शिकार होत होते, प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत योग्य उपचारांविना तसेच आजारपणातही उचित उपचार न मिळाल्याने मरत होते, त्यांचा इतर जगाशी संबंधही नव्हता अशा माणसांसाठी डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. त्यांना त्यांची पत्नी डॉ. मंदाताई यांची सावलीसारखी साथ लाभली. आज प्रकाश यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. गेली सहा दशके ते आदिवासींसाठी आणि जंगलातील पोरक्या जनावरांसाठी कार्य करत आहेत.

डॉ. प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना रोगमुक्त करून सन्मानाचे जीवन दिले. याकामी त्यांची दोन्ही मुले विकास आणि प्रकाश त्यांना मदत करत होती. कुष्ठरोग्यांसाठी भरीव कार्य करतानाच तेथील आदिवासी, वनवासींचे जनावरांसारखे जीवन बघून बाबा खूप व्यथित होत असत. या वनवासींचे जीवन सुखी होण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांनी ठरवले. त्यांनी त्यांचा मनोदय आपल्या चिरंजीवांकडे व्यक्त केला आणि ते आव्हान आपण स्वीकारायचे असा निश्चय शांत, संयमी, कामाची चिकाटी असलेल्या डॉ. प्रकाश यांनी घेतला. डॉ. प्रकाश आमटे त्यांच्या पत्नी ड़ॉ मंदाकिनी आमटे आणि काही साथीदारांसह बाबांनी ठरवलेल्या गडचिरोली जिह्यातील हेमलकसा येथील जंगलात 23 डिसेंबर 1973 या दिवशी आदिवासी, वनवासींची सेवा करण्यासाठी, त्यांनी माणूस म्हणून माणसासारखे जगावे म्हणून राहू लागले. जंगलात कसल्या सोयीसुविधा नसताना झोपडी बांधून जंगली जनावरे, सरपटणारे प्राणी, कीटक, डास यांच्या भयंकर त्रासाला तोंड देत त्यांनी त्यांचा वनवासींसाठीचा संसार सुरू केला. हळूहळू डॉ. प्रकाश यांची टीम आजूबाजूच्या जंगलांमध्ये जाऊन आदिवासी, वनवासी यांना भेटून त्यांना स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यांचे महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांना काही वस्तू, पदार्थ देत. त्यात भाषेची मोठी अडचण येत असे. वनवासींचा सुरुवातीला डॉक्टर, औषधे, शिक्षण यांवर विश्वास नव्हता, पण हळूहळू जसे रुग्ण बरे होऊ लागले तसे अधिक रुग्ण डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांच्याकडे येऊ लागले. त्यांना त्या डॉक्टरांचा आधार वाटू लागला, विश्वास वाटू लागला. फक्त त्यांच्यावर असे उपचार करून आणि त्यांना मदत करून उपयोगाचे नाही, तर त्या वनवासींच्या मुलांना शिकवले पाहिजे. शिक्षणाने पुढच्या पिढय़ा घडतील आणि बाबांनी जे स्वप्न पाहिले ते खरे होईल हे डॉ. प्रकाश यांनी ओळखले आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले, पण प्रतिसाद मिळत नव्हता. आपली मुले तिकडे राहिली तर त्यांना दोनवेळचे पोटभर जेवण तरी मिळेल म्हणून मग आदिवासी मुलांना स्वतःहून डॉ. प्रकाश यांच्याकडे पाठवू लागले आणि हेमलकसा येथे आदिवासींच्या कल्याणाकरिता ‘लोक बिरादरी प्रकल्प’ उभा राहू लागला. कालांतराने वनवासींची जी मुले शिकली ती बऱयाच जागी नोकरीधंदा करू लागली, तर कोणी उच्चपदस्थ झाले आणि त्यांचे जीवनमान बदलले.