मी कधीच बंड केले नाही! शरद पवार यांनी टोचले अजित पवारांचे कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमचे बंड नव्हते, आमच्या काळात आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी बसून तो निर्णय घेतला होता. त्याला आजच्यासारखे स्वरूप नव्हते, त्यामुळे त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या ‘भीमथडी जत्रे’ला शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी काल बारामती येथे बोलताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात झालेल्या बंडावर वक्तव्य केले होते. त्यावर आज शरद पवार यांनी हा टोला लगावला. पवार म्हणाले, आज कोणी काही केले असेल तर त्याबद्दल तक्रार करण्याचे काही कारण नाही. लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली, त्या पक्षाची निर्मिती कशी झाली? त्याचे संस्थापक कोण आहेत? या गोष्टी सर्वांच्या समोर आहेत. त्यामुळे त्यावर अधिक काही बोलण्याची आवश्यकता नसल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

आता माझेच ऐका, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना केले होत़े यावर पवार म्हणाले, कुणी कुणाचे ऐकावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मागच्या दहा ते पंधरा वर्षांत बारामती आणि त्या भागातील स्थानिक निवडणुका, साखर कारखाने, अन्य संस्थांच्या पदावर कोणी जावे आणि कोणी जबाबदारी घ्यावी, यात मी लक्ष घातलेले नाही. त्यामुळे या क्षेत्रात कुणी काम करावे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. या भागात ज्यांना काम करायचे आहे, त्यांनी ते करावे. फक्त या परिसराचा नावलौकीक वाढेल, या भागाचा विकास होईल, याची काळजी घ्यावी.

सर्व्हेतील अंदाजानुसारच निकाल लागेल असे नाही
महाविकास आघाडीला लोकसभेत जास्त जागा मिळतील, असा अंदाज एबीपी–सी व्होटर सर्व्हे म्हणून व्यक्त करण्यात आला आहे, यावर पवार म्हणाले, निवडणुकीसंदर्भातील सर्व्हे नेहमी वेगवेगळे अंदाज दर्शवतात. त्यातील सर्वच बाबी खऱया ठरतील असे नाही. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणुकीसंदर्भातील सर्व्हे खरे ठरले नव्हते. तेलंगणातील निवडणुकीचा सर्व्हे वेगळा होता आणि निकाल वेगळा लागला. त्यामुळे सर्व्हेतील अंदाजानुसार निकाल लागेल असे नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासंदर्भात खरगेंना सुचवले
‘इंडिया आघाडी’ची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मी स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आपल्या सोबत घ्यावे, असे सुचवले आहे. मात्र, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.