ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आरे कॉलनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

उत्तम पाचारणे यांनी साकारलेली अनेक शिल्पं आज देशभरात पाहावयास मिळतात. त्यांच्या शिल्पांनी अनेक ठिकाणच्या सौंदर्यात भर टाकली आहे. पाचारणे यांचा जन्म 2 जून 1956 रोजी नगरच्या चिखलेवाडी गावात झाला. त्यांच्यात उपजत कलेची आवड होती. पुण्यात अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. शिल्पकलेचे शिक्षण त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. शिल्पकलेसाठी त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली.

जहांगीर कलादालनासह देशभरात अनेक ठिकाणी डॉ. पाचारणे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले. कला अकादमी, गोवा, पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई अशा अनेक कला संस्थांचे ते सल्लागार होते. ते मुंबई आर्ट सोसायटीचे तीन टर्म म्हणजेच 30 वर्षे अध्यक्ष होते. नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष (2018 ते 2022) होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान उत्तम पाचरणे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभावंत मूर्तिकारास मुकला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कपिल पाटील यांनी दिली.

सुंदर शिल्पे घडवली
उत्तम पाचारणे यांनी ब्राँझ, स्टोन, क्ले आणि फायबर अशा माध्यमात काम केले. पोर्ट ब्लेअर, अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये त्यांनी स्वातंत्र्य ज्योत साकारली आहे. याशिवाय झाशी व्हाईट टायगर रेजिमेंट, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे शिल्प, स्वामी विवेकानंद, स्वामी रामानंद तीर्थ, अहिल्याबाई होळकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ अशी अनेक सुंदर शिल्पं त्यांनी साकारली आहेत.