पन्हाळागडाशेजारील पावनगडावरील अनधिकृत मदरसा जमीनदोस्त, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची पोलीस बंदोबस्तात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक पन्हाळागडाशेजारी असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केला. गेल्या 45 वर्षांपासून बेकायदेशीर असलेला हा मदरसा हटविण्यासाठी प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता पाळली होती.

मध्यरात्री कारवाई करताना आसपास राहणारे रहिवासी घराबाहेर पडू नयेत, यासाठी त्यांच्या घरांना बाहेरून कडय़ा लावण्यात आल्याचे समोर आले आहे. शिवाय कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसारमाध्यमांनाही घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात कोल्हापूर शहरातील एका बेकायदेशीर मदरशावर कारवाई करण्यात आली. पाठोपाठ ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

ऐतिहासिक पन्हाळागडाला लागूनच छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगडावर सध्या संपूर्ण मुस्लिमवस्ती आहे. याचा गैरफायदा घेत 1979 साली सय्यद नावाच्या व्यक्तीने पावनगडावर हा बेकायदेशीर मदरसा बांधल्याचे सांगण्यात येते. सध्या पश्चिम बंगाल व बिहारमधील 45 मुले येथे शिक्षण घेत होती. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून मदरशाबाबत प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी मध्यरात्री प्रत्यक्ष कारवाई करत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी येथील मुलांना शिरोली येथील मदरशामध्ये दाखल करण्यात आले. हा बेकायदा मदरसा दोन गुंठे जागेत बांधला होता. हे क्षेत्र महसूलच्या अखत्यारीत येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. मदरसा पाडण्यासाठी प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती. यासाठी सुमारे 400हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मदरसा पाडण्याच्या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, राजेंद्र मस्के, ईश्वर उमासे, तसेच महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, पन्हाळा मंडल अधिकारी, तलाठी, नगरपरिषद कक्ष अधिकारी अमित माने आदी कर्मचारी उपस्थित होते.

मदरसा पाडण्यासह त्यामधील साहित्य काढण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. मदरसा पाडण्यासाठी पन्हाळा नगरपरिषदेचे 50 कर्मचाऱयांसह तीन जेसीबी, पाच डंपर यांचा वापर केला. आता या ठिकाणी कोणीही जाऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे, असे पन्हाळा-शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले.

पावनगड येथील गट नंबर 128 संपूर्ण क्षेत्र 2.83 हेक्टर आर इतके आहे. ही जमीन सरकारी मुलकीपड जमीन म्हणून आहे. या जमिनीतील दोन गुंठे क्षेत्रावर सय्यद गुलाब मुजावर याने अरबिया झिन्नतुल कुरण मदरसा ही संस्था 22 जून 1979 रोजी स्थापन केली. या संस्थेने येथे अतिक्रमण करीत अनधिकृत मदरशाचे बांधकाम केले. अतिक्रमण काढून घेण्याबाबत पन्हाळा तहसीलदारांनी सहा महिन्यांपूर्वी जुबेर सय्यद मुजावर यांना नोटीस बजाविली होती. याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी शुक्रवारी मध्यरात्री मदरसा पाडून टाकण्याची कारवाई केली. त्यापूर्वी तेथील शिकत असलेली 45 मुले अन्य ठिकाणी स्थलांतरित केली. याबाबत मदरसा संस्थेने पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना सहकार्य करीत सर्व साहित्य काढून घेतले. उर्वरित पक्के बांधकाम प्रशासकीय कारवाईत पाडून जमीनदोस्त करण्यात आले. याबाबत मदरसा संस्थेची कोणतीही तक्रार नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.