
हिवाळ्यामध्ये अनेकदा लोकं आजारी पडतात. थंडीचा काळ असल्याने सर्दी, पडसे, खोकला व अन्य काही आजारांमुळे लोकं हैराण होतात. हे आजार जरी लगेच बरे होणारे असले तरी वारंवार आजारी पडत असल्याचे चिंतेचे कारण असू शकते. वारंवार आजारी पडत असाल तर तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असू शकते. अलिकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे आहारात देखील बदल झाला आहे. काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे नकळत आपली प्रतिकारशक्ती आपोआप कमकुवत होते. जाणून घेऊया या गोष्टी…
पुरेशी झोप न मिळणे
आरोग्य निरोगी ठेवायचे असल्यास योग्य आहार व व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणे देखील महत्वाचे आहे. झोपल्यानंतर शरीर सायटोकिन्स नावाचे प्रथिन तयार करते, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. संशोधनानुसार, कमी झोप झाल्यास शरीर विषाणू आणि जंतूंना संवेदनशील बनविते ज्यामुळे बरे होण्याकरीता बराच वेळ लागतो.
ताण घेणे
तज्ञांच्यामते, एखाद्या व्यक्तीने प्रमाणाच्या बाहेर ताण घेतला तरीही, प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. केवळ 30 मिनिटांत प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे सतत तणावाखाली राहिल्यास आरोग्याच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागू शकते.
व्हिटॅमिन डीची कमतरता
सूर्यप्रकाशापासून सहस मिळणारे व्हिटॅमिन डी हिवाळ्यात मिळणे अवघड होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकार शक्तीवर तर परिणाम होतोच पण हाडे देखील ठिसूळ होतात. केवळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने हे जीवनसत्व मिळते असे नसून आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास व्हिटॅमिन डी मिळू शकते. मासे, अंडी यामधून मिळू शकते.
फळे आणि भाज्या न खाणे
फळे आणि भाज्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी निर्माण करण्यासाठी मदत करतात. फळे आणि भाज्या हे पोषक तत्वांचे मुख्य स्त्रोत असल्याने हिवाळ्यामध्ये याचे सेवन करणे आवश्यक आहे.
व्यायाम न करणे
व्यायाम न केल्यास प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. दररोज एअरोबिक्स हा व्यायामप्रकार केल्याने शरिरामध्ये रक्ताभिसरण वाढते, जे शरीराला जंतूंपासून संरक्षण करण्यास मदत करते.






















































