
प्रभू श्रीराममंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला. आता भाजप आणि आरएसएस त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी सत्ताधारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्यासोबतच गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का? असा सवाल शरद पवारांनी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सन्मानार्थ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमास शरद पवार यांनी हजेरी लावली होती. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा असा सल्ला देत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर!
धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्येचा श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला आहे. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम बाजूला राहिले मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतासाठी फायदा करून घेत आहेत, अशी खरमरीत टीका शरद पवारांनी केली आहे.
























































