
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यातील सर्व अंगीकृत व संलग्न संघटनेचे शिबीर बुधवारी शिवसेना भवन येथे संपन्न झाले. या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक संघटनांच्या वाटचालीचा लेखाजोखा सुभाष देसाई यांनी मांडला.
शिवसेना उपनेते तथा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी बेस्ट कामगार सेना कशा पद्धतीने काम करत आहे याची माहिती दिली. शिवसेना उपनेते तथा शिवसेना अंगीकृत संघटनांचे समन्वयक भाऊ कोरगावकर यांनी सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱयांनी संघटनांची नोंदणी, पदाधिकारी संख्या व इतर माहिती लवकर जमा करावी. सर्व अंगीकृत संघटनांचे दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल, अशी सूचना केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय कामगार सेनेचे चिटणीस कोणार्क देसाई यांनी केले.




























































