
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
प्राचार्य रामदास डांगे सर एवढे लांबलचक नाव घेण्यापेक्षा मी या लेखात यापुढे डांगे सर या सुटसुटीत नावाने त्यांचा उल्लेख करणार आहे. कारण ते इतके साधेसुधे व्यक्तिमत्त्व होते की, त्यांनाही हे संबोधन आवडले नसते. डोक्यावर दाट काळय़ाकुळीत केसांचा मागे वळवलेला भांग, भव्य कपाळ, भुवया उंचावलेल्या, अंतर्गोल भिंगाचा गोल फ्रेमचा चष्मा, सरळ नाकाखाली छोटय़ाशा जिवणीवर नाकापासून खाली उतरलेली मिशी, एकूण चेहरा समोरच्याला आश्वस्त करणारा. अंगात साधा पँटशर्ट, किरकोळ शरीरयष्टी, पायात तशाच गावरान वहाणा, प्रथमदर्शनी ग्रामीण वाटणारे हे व्यक्तिमत्त्व किती व्यासंगी आहे याचा अंदाज लागणे शक्यच नसल्यामुळे लोक त्यांच्याशी मोकळेपणे बोलायचे आणि तेही तेवढय़ाच आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधायचे. अशा अडाणी लोकांपैकी मी एक. त्यांची पार्श्वभूमी माहीत नसताना मी त्यांच्याशी बोलायचो. तेही मजेदारपणे बोलायचे.
त्यांच्याशी बोलले की, मला नेमके कोणते समाधान मिळायचे याची मीमांसा करण्याच्या भानगडीत मी कधीच पडलो नाही. हळूहळू मला जाणीव होत गेली. प्रकांड पंडित, अभूतपूर्व व्यासंग, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, ज्यांच्या प्रत्येक शब्दाला विद्वतसभेमध्ये मोल होते अशा आभाळाएवढय़ा उंचीच्या व्यक्तीबरोबर आपण कसले फालतू बोलत होतो हे जाणवून मला माझीच लाज वाटत गेली.
माझ्याहीपेक्षा माझ्या पत्नीचे ते आराध्यदैवत. एक तर ते तिचे प्राचार्य होते आणि मार्गदर्शकही होते. त्यांच्या नात्यामुळे मीही आपोआपच त्यांच्या जवळ आलो. प्राचार्य या पदाचा एक दबदबा असतो. स्टाफ दबावाखाली असतो. त्यांचा शब्द हे शेवटचे प्रमाण असे वातावरण असते. पण डांगे सरांच्या काळात सगळय़ांना मुभा होती. लहान मुले एकमेकांच्या खोडय़ा काढून वडिलांकडे पारी घेऊन जातात तसे काहीसे वातावरण होते. मिश्कील हसत ते प्रत्येक समस्येचे सहज निराकरण करायचे. इतका निगर्वी, निरागस माणूस माझ्या आयुष्यात मी प्रथमच पाहिला.
अनेक दिग्गज त्यांच्या भेटीला यायचे. कॉलेजात कुणाला पत्ताही नसायचा. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, साहित्यातले मान्यवर, कलाक्षेत्रातले कलावंत, अगदी हृदयनाथ मंगेशकर, उषाताईसारखी मंडळी कॉलेजला भेट द्यायची, ती डांगे सरांसाठी. तेव्हा गाजावाजा न करता सगळय़ा स्टाफला बोलवायचे, छोटासा कार्पाम आयोजित करायचे. त्याचे संचलन, आभारप्रदर्शन सगळे काही तेच करायचे. तोपर्यंत मंचावरचा तो लोकमान्यता मिळवलेला पाहुणा ओशाळून जायचा.
वयाच्या पंचविशीतच प्राचार्यपदाची माळ त्यांच्या गळय़ात पडली आणि या लहानखुऱया माणसाने शैक्षणिक प्रांतात आपले स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केले. ते ज्या ज्या कॉलेजात गेले ते कॉलेज पूर्ण विद्यापीठात ‘प्राचार्य डांगे सरांचे कॉलेज’ म्हणून ओळखले जात होते. सहकारी, विद्यार्थी त्यांच्याशी मोकळेपणाने वागणे, शैक्षणिक पद्धत काटेकोरपणे अमलात आणणे, शिकवताना कुणी चुकले तर कुणाचाही मुलाहिजा न राखता त्याला समज देणे ही त्यांची खासियत होती. ही समज देतानाही ते हसतखेळत देत असत.
‘ज्ञानेश्वरी’ हा त्यांचा श्वास आणि ध्यास होता. ‘ज्ञानेश्वरी’वरचा त्यांचा एक संशोधन ग्रंथ मान्यताप्राप्त झाला. आळंदी देवसंस्थानामार्फत त्यांना ‘ज्ञानेश्वर तुकाराम’ पुरस्कारही देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना शासनातर्फे संत वाङ्मयाचे एक स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले होते. या सगळय़ातली तांत्रिक माहिती मी आपल्यापरीने देतोय. चूकभूल क्षमस्व!
डांगे सरांची अजून एक आवड म्हणजे भटकंती. कायम प्रवासात. “मंगेशराव, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी अद्याप ‘रिझर्व्हेशन’ करून कधीच प्रवास केला नाही. मनात आले की निघालो.” सरांनी कधीही ‘फर्स्ट’चा आग्रह धरला नाही. जे मिळेल ते तिकीट घ्यायचे आणि निघायचे. आश्चर्य म्हणजे त्यांना कुठेही सहज जागा मिळायची. ते जगन्मित्र होते. त्यांना ओळखणारे असंख्य होते. त्यामुळे त्यांना ‘जागेची’ वाण कधी पडली नसावी. त्यांचे घर म्हणजे एक अद्भुत प्रकरण होते. ते कधी अडचणीचे वाटायचे तर कधी प्रशस्त वाटायचे. याची उकल त्यांनीच एकदा केली. “त्याचे काय आहे. समोर दिसतात त्या भिंती नाहीयत मुळी. ती पार्टिशन्स आहेत. प्रसंगानुरूप मी त्या सरकवून घेत असतो. शेवटी काय, आपले आयुष्य म्हणजे काय, रंगमंच असे म्हटले जाते ना. मी ते प्रत्यक्षात आणतो झाले.” हे सांगून ते हसले.
सरांमध्ये अनेक व्यक्तिमत्त्वे दडलेली होती, ते विद्वान तर होतेच, पण त्यासोबत त्यांच्यामध्ये एक मिश्कील कलंदरपणा होता. ते आनंदयात्री होते. विलक्षण साधेपणा होता. समाजाच्या कोणत्याही स्तरात मिसळण्याची हातोटी त्यांना उपजतच मिळाली होती.
माझ्या परभणीच्या दिवसांमध्ये आम्हा उभयतांना कायमचे अंकित करून ठेवणारे हे व्यक्तिमत्त्व प्राचार्य रामदास डांगे!





























































