
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
झारखंडचे माजी लोकनियुक्त मुख्यमंत्री हेमंत सोरेन मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकही घेऊ न देता थेट तुरुंगात डांबण्यात आले. सोरेन यांनी तुरुंगात जात असतानाच राजीनामा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाला नेमायचे असा पेच निर्माण झाला. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चंपई सोरेन यांचे नाव नक्की झाल्यावरही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना ताटकळत ठेवले आणि झारखंडसारखे संवेदनशील राज्य चाळीस तास मुख्यमंत्र्याविना आणि सरकारविना ठेवण्याचा ‘पराक्रम’ केला. झारखंडचा हा डाव भाजपवर उलटण्याचीच शक्यता जास्त आहे.
जानेवारीच्या शेवटच्या दिवशी दिल्लीतून ईडीला गुंगारा देऊन हेमंत सोरेन रांचीमध्ये पोहोचले. मात्र रांचीमध्ये ईडीने त्यांच्या अटकेसाठी फिल्डिंग लावली. सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱयांविरोधातच गुन्हा दाखल करून अटक टाळण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वरून आदेश असल्याने येनकेनप्रकारेण ईडीने त्यांना तुरुंगात डांबलेच. ईडीला मराठीत सक्तवसुली संचालनालय म्हटले जाते. अशाच सक्तपणे त्यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यावर कारवाई केली. त्या मुख्यमंत्र्याला आपला उत्तराधिकारी नेमण्याइतकाही वेळ दिला गेला नाही, की मंत्रिमंडळ बैठक होण्यापर्यंतही वाट पाहिली गेली नाही. इतक्या झटपट ही कारवाई झाली. भावनेच्या भरात ईडीने दिल्लीश्वरांना खूश करण्यासाठी हे केले खरे, मात्र त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला. हेमंत यांनी राजीनामा दिल्याने व त्यांचा उत्तराधिकारी नेमलेला नसल्याने झारखंड हे राज्य चाळीस तास मुख्यमंत्र्याविना राहिले. किंबहुना ते तसे निर्नायकी ठेवले गेले. या चाळीस तासांत चाळीस खोके वगैरेंचे प्रयोगही झाले. मात्र झारखंडचे आमदार निष्ठेला जागले. हेमंत सोरेन यांच्या पाठीशी राहिल्याने तूर्तास तरी हे संकट टळले आहे. हेमंत सोरेन यांना एनडीएमध्ये आणण्याच्या हालचाली बऱयाच दिवसांपासून सुरू होत होत्या. मात्र हेमंत यांनी त्याला दाद न दिल्यामुळे अखेरीस पेंद्रीय सरकारचा महत्त्वाचा घटक असलेल्या ईडीकडे सोरेन यांची असाइनमेंट सोपविण्यात आली, ती ईडीने फत्ते केली. मात्र त्यामुळे भाजपच्या चालचरित्र व चेहऱयाच्या पार चिंधडय़ा उडाल्या. लोकशाहीची थट्टा झाली. सरकारच्या अब्रूची लक्तरे रांचीच्या वेशीवर टांगली गेली. आपले राज्य चाळीस तास वाऱयावर सोडलेले होते ही भावना झारखंडमध्ये प्रादेशिक अस्मितेची लाट निर्माण करू शकते. ती निर्माण झाल्यावर दिल्लीकर आणि ईडी या दोघांनाही पळताभुई होईल. ईडीचे सगळेच डाव सुलटे पडत नाहीत ते कधी कधी उलटेही पडतात. झारखंडचा डाव असाच महागात पडण्याची शक्यता अधिक.
गल्ला यांची ‘मन की बात’
राजकारणाचा स्तर इतका खाली घसरला आहे की, चांगल्या माणसाने राजकारणात राहूच नये. राजकारणातून सहसा कोणी सहजासहजी निवृत्त होत नाही. ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ असे म्हणत राजकारणातले म्हातारे अर्क तर अखेरच्या श्वासापर्यंत बॅटिंग करत असतात. मात्र ऐन तरुण वयात तेलुगू देसमचे उच्चविद्याविभूषित खासदार जयदेव गल्ला यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे खळबळ उडाली असली तरी त्यामागचे कारण समजल्यावर कोणीही सुजाण माणूस सध्या हाच विचार करेल. गल्ला हे विलायतेत वगैरे शिकून आलेले टेक्नोव्रॅट गृहस्थ आहेत. त्यांच्या स्वतःच्या आयटी पंपन्या आहेत, अनेक व्यवसाय आहेत. या सगळय़ाच्या जोरावर ते राजकारणात आले. लोकसभेचे दोन वेळा खासदारही बनले. मात्र आता ही खासदारकीच त्यांना ‘गले का फंदा’ वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे गल्ला तेलुगू देसमचे असल्याने आंध्रात जगनमोहन रेड्डी सरकारने त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावलेला आहे. त्यात केंद्राच्या प्याऱया ईडीनेदेखील चंद्राबाबू वश होत नाहीत हे पाहून तेलुगू देसमच्या खासदारांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. व्यावसायिक पंपन्यांसाठी अनेकदा सरकारी कचेरीत खेटे घालावे लागतात. नको त्या लोकांनाही सलाम, नमस्ते करावे लागते आणि आपला व्यापार सांभाळावा लागतो. आता या उद्योग- व्यापारावरच दोन्हीकडची सरकारे टाच आणत असतील तर गल्लांसारख्या उद्यमी माणसाची गोची होणारच. त्यामुळे व्यवसाय वाचविण्यासाठी गल्लांनी आता राजकारणाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात चांगली आणि सुशिक्षित माणसे येत नाहीत अशी बोंब एकीकडे मारली जाते आणि दुसरीकडे सुशिक्षितांना अशा प्रकारे छळले जाते. मग राजकारणाचे शुद्धीकरण होणार तरी कसे. गल्लांचा अनुभव लक्षात घेतला तर राजकारणात येऊ इच्छिणारे नवयुवक खरोखरच राजकारणात येतील काय?
निर्मलाताईंचा ‘षटकार’
निर्मला सीतारामन यांनी कारकीर्दीत पाच वेळा पूर्ण बजेट आणि एकदा अंतरीम बजेट मांडण्याचा पराक्रम करून मोरारजी देसाईंच्या विक्रमाची बरोबरी केली, तर माजी पेंद्रीय अर्थमंत्री पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, अरुण जेटली व पी. चिदंबरम यांच्या पाच वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रमही मोडीत काढला. निर्मलाताईंच्या अंतरीम बजेटमध्ये दिलासादायक असे काही नसले तरी किमान एक महिला म्हणून त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला हेही नसे थोडके. वास्तविक, कोणताही राजकीय आगापिछा नसताना निर्मलाताई राजकारणात आल्या. अगदी काही वर्षांपूर्वी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना निर्मला सीतारामन या पत्रकारांच्या शेजारी बसून नोटस् काढत असत. जेएनयूचे अॅपॅडेमिक बॅकग्राऊंड असणाऱया निर्मलाताईंचा राजकारणातला उदय तसा अचानकच झाला. एक गृहिणी घरातले बजेट हे उत्तमपणे सांभाळते असे म्हटले जाते. मात्र महागाईच्या डायनने देशभरातील माताभगिनींचे किचन बजेट कोलमडलेले असताना महागाईच्या या डायनवर छू मंतर करण्यात निर्मलाताई सपशेल अपयशी ठरल्या आहेत. महागाईने जनतेचे पंबरडे मोडलेले असताना मोदी सरकारला देशभरात सगळे ऑल इज वेल वाटत आहे. जुलैमध्ये पुन्हा पूर्णवेळ बजेट मांडण्यासाठी आम्हीच येऊ, असे निर्मलाताईंनी ठणकावून सांगितले आहे. जुलै फार दूर नाही. कोणाचे सरकार बनते व कोण अर्थमंत्री होते हे तेव्हाच ठरेल. निर्मलाताईंना अर्थमंत्री म्हणून षटकार ठोकण्याची संधी मिळाली यातच त्यांनी तूर्तास समाधान मानायला हवे!


























































