वॉर्नरच्या वादळासमोर विंडीजचा धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकदिवसीय मालिकेमध्ये निर्भेळ यश मिळवणाऱया ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातदेखील पराभवाची धूळ चारली आहे. डेविड वॉर्नर नावाच्या वादळामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाचा पालापाचोळा केला.

वॉर्नरने 36 चेंडूंत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने केलेल्या 70 धावांच्या तुफानी खेळीमुळे पहिल्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाची करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी फलंदाजीमुळे वेस्ट इंडीजवरच उलटला. वॉर्नरचे तुफानी अर्धशतक, जोश इंग्लिसच्या 25 चेंडूंत 39 धावा आणि टिम डेव्हिडच्या 17 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 37 धावांच्या तडाख्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 गडय़ांच्या मोबदल्यात 213 धावांचा डोंगर उभा केला होता. वेस्ट इंडीजचा आंद्रे रसल याने 4 षटकांत 42 धावा देत 3 गडी बाद केले. तर अल्झारी जोसेफ याने 2, जेसन होल्डर आणि शेफर्डने प्रत्येकी एक गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात जोरदार झाली. ब्रँडन किंग आणि जॉन्सल चार्ल्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. किंगने 37 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23, तर, चार्ल्स 25 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 धावा करून तंबूत परतले. किंग आणि चार्ल्स बाद झाल्यानंतर वेस्ट इंडीजची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. अॅडम झम्पाने 4 षटकांत 26 धावा देत 3 गडी बाद करून वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा कणा मोडला. तर मार्कस स्टॉइनीसने दोन, सीन एबट, ग्लेन मॅक्सवेल आणि बेहरनडफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून झम्पाला उत्तम साथ दिली.