काव्यरसग्रहण -चिरतरुण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गुरुनाथ तेंडुलकर

अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जगद्विख्यात गायिका आशा भोसले यांच्या 90व्या वाढदिवसाचं औचित्य साधून दुबईत एक भव्य कार्पाम आयोजित केला होता. त्या कार्पामाचा व्हिडीओ यू टय़ूबवर उपलब्ध आहे. त्या कार्पामात आशाताईंनी अनेक नवी जुनी गाणी स्वत गाऊन उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. अगदी ‘दम मारो दम’पासून ते ‘पिया तू अब तो आजा’पर्यंत आणि ‘हंगामा हो गया’पासून ते ‘कभी अलविदा ना कहना’पर्यंत अनेक गाणी त्या पूर्ण जोमात आणि जोशात गायल्या आहेत.

हा कार्पाम पाहताना आशाताईंच्या चेहऱयावरचे भाव, गाताना त्यांनी धरलेला पायाचा ठेका आणि हालचालीतली सहजता पाहून यांचं वय नव्वद झालं हे सांगूनदेखील खरं वाटलं नाही. आशाताईंचा हा नव्वदीचा कार्पाम पाहताना माझ्या मनात एक विचार आला. केवळ वय वाढलं म्हणून माणसाला म्हातारपण येत नाही. केवळ वय वाढलं म्हणून माणसाचं तारुण्य सरत नाही. तारुण्य आणि वृद्धत्व ही केवळ मनाची अवस्था असते.

कुठे असतं हे तारुण्य?

तारुण्य तिथे असतं, जिथे प्रगल्भता आणि अवखळपणा दोन्हीही एकत्र नांदतात.
तारुण्य तिथे असतं, जिथे जोम, जोश आणि उत्साह असतो.
तारुण्य तिथे असतं, जिथे धमन्यातून वाहणारं रक्त कायम गरम असतं.
तारुण्य तिथे असतं, जिथे फुलं पाहून ओठांवर हास्य उमलतं आणि मोरपिसाच्या स्पर्शाने अंग रोमांचित होतं.
तारुण्य तिथे असतं, जिथे अन्याय पाहिला की, हाताच्या मुठी वळतात आणि ओठ दाताखाली मुडपला जातो.
तारुण्य तिथे असतं, जिथे डोक्यात व्यवहाराची गणितं असतात, पण मनात मात्र कविता फुललेली असते.
तारुण्य तिथे असतं, जिथे मंदिरातली आरती ऐकून हात टाळ्या पिटतात आणि लेझीम-ढोलाचा नाद कानात घुमला की, पाय त्या ठेक्यावर ताल धरतात.
तारुण्य तिथे असतं, जिथे डोळ्यात भावुक स्वप्नं असतात आणि गात्रांत थरार असतो.
तारुण्य तिथे असतं, जिथे चित्तात शुभसंकल्प धारण केले जातात आणि ते सिद्धीस नेण्याची जिद्द असते.
तारुण्य तिथे असतं, जिथे भूतकाळाचं ओझं न बाळगता भविष्यकाळाचं स्वागत करण्याची वृत्ती असते.

माणसाचं तारुण्य हे त्याच्या वयावर कधीही अवलंबून नसतं. ती मनाची एक अवस्था असते. ती एक वृत्ती असते.
वय काय, ते तर वाढतच असतं.

दररोज सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो. कॅलेंडरवरची तारीख बदलते. वर्ष सरलं की, कॅलेंडरसुद्धा बदलतं. सरलेल्या प्रत्येक दिवसागणिक आपलं वय वाढतच जातं. ते वाढणारच असतं, पण वय वाढलं तरी वय होऊ न देणं मात्र आपल्या हातात असतं. ‘वय वाढणं’ आणि ‘वय होणं’ या दोन्ही गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. मनाची योग्य जोपासना केली की, माणूस अखेरच्या श्वासापर्यंत तरुण राहू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा निकोप आणि आशादायक दृष्टिकोन ठेवायला हवा. सौंदर्यग्राही वृत्ती तसंच उत्कट भावनाशीलतादेखील जपायला हवी.

याच चिरतारुण्यावर आधारित आजची आपली कविता… चिरयौवन! या कवितेचे कवी आहेत सुप्रसिद्ध आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल. ही कविता मला एसएससीच्या मराठी ाढमिक पुस्तकात होती. प्रत्येक वेळी ही कविता वाचताना मनाला एक वेगळाच आनंद लाभतो. अनिलांची ही कविता मराठी कवितेच्या विश्वातील एक चिरतरुण कविता मानली जाते.
[email protected]

चिरयौवन

फिरून वर्षपा हे पुढे पुढेच जातसे
विशी तिशी नि चाळिशीही लोटली जरी दिसे
असे तरीही गोठली न जीवनातली उषा
तशाच रंगसंगतीत वृत्ती गुंतती तशा
अजून ऊन रक्त हे भरे नसानसांतुनी
तसाच रोमहर्ष आणि अंग ये थरारुनी
विरक्ती? छे…. सदानुरुक्ती…
भक्ती… प्रेमभक्त मी
तरंग ऊर्मी प्रीतीच्या अजून यौवनात मी

अजून यौवनात मी नि दंग जीवनात या
प्रसादही प्रमादही प्रमोद आणखी दया
विचार आणखी विकार भावनांत पाझरे
मधू न त्यातला सरे म्हणे न मीही त्या पुरे
अरे कशास जीवना विचार आणसी मना
उदंड पाज आजची उद्याची तीही आण ना
पुरे भरावयास पात्र हे नको करू कमी
तिथे सदा अतृप्त मी अजून यौवनात मी

अजून यौवनात मी मुले फुले सभोवती
विकासती विलासती हसून हासवीत ती
प्रलोभनात प्रीतीच्या कुणी हसे झुरे तिथे
तिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे
प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेस त्या
मुलात मूल होत मी फुलांत भृंग होत त्या
भरीत रंग बैठकीत स्नेह सोबतीत मी
प्रियेस प्रेम होत मी अजून यौवनात मी

काव्यसंग्रह : पेर्ते व्हा! कवी : अनिल