अभिप्राय – ‘पिंगुळी’च्या लोककला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेश चव्हाण

रामचंद्र वरक हे ‘इंडियन नॅशनल थिएटर’च्या लोक प्रायोज्य कला संशोधन केंद्रात समन्वयक म्हणून कार्यरत होते. डॉ. अशोक परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील लोककलांचा अभ्यास केला. विशेषत कुडाळ येथील ‘पिंगुळी’ गावातील ठाकर समाजातील आदिवासींच्या लोककलांचा अभ्यास व त्या कलाकारांच्या मुलाखतींतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.

आदिवासींच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहताना निसर्गाशी एकरूप होण्यासाठी त्यांना या कलांचा आधार लागतो. ‘पिंगळ्यांची पिंगुळी’ या पहिल्याच प्रकरणात ठाकर समाजातील ‘पिंगळा’ या लोककलावंताविषयी वरक लिहितात, पिंगळा पहाटेच्या वेळी गात गात गावात येतो व घरासमोरील अंगणात येऊन दान मागतो. आयाबाया त्याला दान देतात आणि आशीर्वाद घेतात. रात्रीच्या वेळी चोर, दरोडेखोर किंवा परकीय शत्रू यांच्या हालचाली टिपून लोकांना सावध करण्याचे काम पिंगळा करतो. हा पिंगळा ज्या गावात वस्ती करून राहिला, त्या गावाला ‘पिंगुळी’ हे नाव रूढ झाले. पिंगुळीचा ठाकर समाज हा चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर रामायण, महाभारतातील चित्रं दाखवून त्यावर कथा सांगितली जाते. त्याला ‘चित्रकथी’ असे संबोधतात. ठाकर त्याला ‘पोथी सोडणे’ असेही म्हणतात. ‘करपल्लवी’ हा कला प्रकारही सादर करतात. हाताच्या बोटांच्या खुणांनी ओळखल्या जाणाऱया सांकेतिक भाषेचा खेळ म्हणजे ‘करपल्लवी’. स्थानिक भाषेत या खेळाला ‘आकडय़ांचा खेळ’ असं म्हटलं जातं.‘पोतराज’ हा दैवी शक्तीला आवाहन करत स्वतला पेटत्या दिव्यांचे चटके देत, गावोगाव हिंडत जोगवा मागत असतो. तसेच पिंगुळीच्या ठाकर आदिवासींमधील आटक घराणे गोंधळ घालण्याचे काम करतात.

या कलावंतांचं समाजमनाशी भावनिक नातं जुळलेलं आहे. लेखकाने या लोककलांचा अभ्यास करून त्यावर हे पुस्तक लिहिले आहे. या छोटेखानी पुस्तकातून कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यातील या आगळ्यावेगळ्या लोककलांचा आपल्याला परिचय करून दिला आहे. कृष्णा मसगे यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ व रेखाटनेही आशयाला साजेशी रेखाटली आहेत.

पिंगुळीच्या अंगणात… लेखक : रामचंद्र वरक
प्रकाशक : ललित पब्लिकेशन पृष्ठे : 142 मूल्य : रु. 230