
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातील 50 किलो वजनाचे चांदीचे सिंहासन रविवारी मध्यरात्रीनंतर चोरटय़ांनी चोरून नेले. या सिंहासनाची किंमत 30 लाख रुपये असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. चोरीची ही घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे.
पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा मुख्य दरवाजा चोरटय़ांनी कटावणीच्या साहाय्याने तोडून मध्यरात्री मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे 50 किलो वजनाचे अंदाजे 30 लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरून नेले. चोरीची ही घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे.
आज पहाटे श्रीगोंदा येथील व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असताना चोरीची ही घटना उघडकीस आली. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. पुजारी धुमाळ यांनी तातडीने मंदिराकडे धाव घेत पाहणी केली. त्यानंतर घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना देऊन त्यांनी गावकऱयांना जमा केले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने मंदिरात धाव घेत पाहणी केली. घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पुढील तपासासाठी श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच घटनास्थळी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, उपनिरीक्षक समीर अभंग यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करत तपास सुरू केला. या घटनेतील आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
चोरटय़ांना तातडीने अटक करा; ग्रामस्थांची मागणी
n श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली. या सभेमध्ये ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत चोरटय़ांना तत्काळ शोधून अटक करावी, अशी मागणी ग्र्रामस्थांनी केली आहे.




























































