कराड येथील घनकचरा प्रकल्पाला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगाशिवनगरात घनकचरा प्रकल्पाला बुधवारी (दि. 28) रात्री मोठी आग लागली. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भीषण आगीत बेल्ट कन्वेअर, बेलिंग मशीन, सोलर पॅनलसह शेड व रॉमटेरिअल जळून खाक झाले. या घटनेमध्ये कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. कराड पालिका, कृष्णा हॉस्पिटल अग्निशमन यंत्रणेच्या साहाय्याने सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर येथील घनकचरा प्रकल्पात आग लागल्याचे आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बघता बघता आगीचे लोळ बाहेर पडू लागले. आगीची माहिती मिळताच, मनोहर शिंदे, राजेंद्र यादव, सागर जाधव, जयंत कुराडे, धनंजय येडगे, प्रशांत गावडे, अभिजित शिंदे, रमेश बागल, रामदास तडाखे, संपत हुलवान, सावकार देवकुळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व सर्व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, काही नागरिकांनी आगीची माहिती कराड नगरपालिका, कृष्णा हॉस्पिटल अग्निशमन दल यंत्रणेला दिली. माहिती मिळताच, दोन्ही ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत प्रकल्पातील बेल्ट कन्वेअर, बेलिंग मशीन, सोलर पॅनल, शेड, वायरिंगसह रॉमटेरिअल जळून खाक झाल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले.