
पावसाळय़ात मुंबईतील सखल आणि समुद्राजवळच्या परिसरात अतिवृष्टी आणि त्याचवेळी आलेल्या भरतीमुळे पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून नाला रुंदीकरण, गाळ उपशाची कामे हाती घेण्यात आली आहेत. महापालिका कुलाबा येथील नेव्हीनगर येथील कारगील नाल्याचे रुंदीकरणासह खोलीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पालिका 7 कोटी 2 लाख 33 हजार 341 रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळय़ात अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचून वाहनचालकांना, स्थानिकांना मोठय़ा मनःस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदाच्या पावसाळय़ापूर्वी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने नाल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नाल्याला लागून 10 फूट उंच जाळय़ा उभारणे, नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण यावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वॉर्डातील नेव्हीनगर परिसरात कारगील नाला असून त्या नाल्याची दुरुस्ती, रुंदीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या असून पुढील 12 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.
नाले व लांबी
लहान नाले – 309
मोठे नाले – 1,508
लांबी – 605 किलोमीटर
रस्त्यांशेजारील नाल्यांची लांबी – दोन हजार किलोमीटर
























































