
मुंबईच्या पवईत भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तीन कुत्रे दगावल्याने प्राणिमित्रांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवईतील विनस सोसायटीत हा प्रकार घडला. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ खाद्यपदार्थ ठेवण्यात आला होता. तो खाल्ल्याने तीन कुत्रे तडफडून जागीच दगावले तर अन्य एक कुत्रा गंभीर आहे. त्याला परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पवईतील ए. एस. मार्गावर ही सोसायटी आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर प्राणिमित्रांकडून पोलिसांना कळवण्यात आले. त्याची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात विषप्रयोग करून कुत्र्यांना ठार मारण्यात आल्याचे दिसत आहे.



























































