चलो वानखेडे… रणजीचा अंतिम सामना बीकेसी नव्हे वानखेडेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईने उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए)हा सामना वानखेडेवर न खेळविता आसनशून्य बीकेसीवर खेळवला होता. त्यामुळे एमसीएला क्रिकेटप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. मात्र तामीळनाडूविरुद्धचा सामना अवघ्या तीन दिवसांतच आपल्या खिशात घालत अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या मुंबईचा अंतिम सामनाही बीकेसीवर खेळविला जाणार असल्याची चर्चा होती, मात्र एमसीएने मुंबईच्या विजयानंतर सर्वच क्रिकेटप्रेमींना ‘चलो वानखेडे’चे आवाहन केले आहे. अर्थातच येत्या 10 ते 14 मार्चदरम्यान होणारा सामना मुंबईकरांच्या आवडत्या वानखेडेवर खेळविला जाणार असल्याचे एमसीएने जाहीर करून मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली.

मुंबईकरांचे जगप्रसिद्ध क्रिकेटप्रेम आजही कायम आहे. टी-20च्या जमान्यातही रणजी सामन्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आजही हजारो प्रेक्षक वानखेडेवर गर्दी करतात. असे असतानाही सामान्य प्रेक्षकांची फारशी सोय नसलेल्या बीकेसी ग्राऊंडवर सामना खेळवला होता. त्यामुळे एमसीएवर जोरदार टीका करण्यात आली. एमसीएने बीकेसीवर 500 क्रिकेटप्रेमींच्या बसण्याची व्यवस्था केली होती. पण दर्दी क्रिकेटप्रेमींसाठी बीकेसी ग्राऊंड गाठणे सोपे नव्हते. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या वानखेडेवरच अंतिम सामना खेळवणार असल्याचे एमसीएने जाहीर केले.

मुंबईच्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी एमसीएने क्रिकेटप्रेमींना वानखेडेवर विनामूल्य सामना पाहण्याची व्यवस्था केली आहे. अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध विदर्भ खेळणार, की मध्य प्रदेश याचा फैसला अद्याप झालेला नाही, पण 10 मार्चपासून सुरू होणाऱया या सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठय़ा संख्येने गर्दी व्हावी म्हणून हा सामना विनामूल्य करण्यात आला आहे. या अंतिम सामन्यानिमित्त शालेय-महाविद्यालयीन क्रिकेटपटूंना अनेक वर्षांनंतर वानखेडेवर रणजीच्या अंतिम सामन्याचा आनंद येणार आहे. 11 वर्षांपूर्वी वानखेडेवर मुंबई सौराष्ट्रविरुद्ध खेळली होती आणि आपले 40 वे विक्रमी जेतेपद पटकावले होते. आता त्यात आणखी एकाची भर घालण्याची संधी मुंबईला लाभली आहे.

डर के आगे जीत है…
यंदाच्या मोसमात उत्तर प्रदेशविरुद्धचा एकच सामना वानखेडेवर झाला आणि त्याच सामन्यात मुंबईला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर, यंदा मुंबईने एकच सामना गमावला असून तोसुद्धा वानखेडेवरच. दुसरीकडे बीकेसीवर झालेल्या चारही सामन्यांत मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई संघानेच वानखेडेपेक्षा बीकेसीच बरी असा सूर आळवला होता. मात्र आता अंतिम सामना वानखेडेवर होत असल्यामुळे त्यांची धाकधूक पुन्हा वाढली आहे. डर के आगे जीत है म्हणत ते वानखेडेवर जिंकण्यासाठी उतरणार आहेत. पाहूया, मुंबईची भीती संपतेय की वाढतेय.