
आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही वर्षांपूर्वी नोकरदार वर्ग सेवानिवृत्त होताना आयुष्यभर साठवलेल्या पैशांतून घर खरेदी करण्याचा विचार करायचा. आता हा ट्रेंड पूर्णपणे बदलला असून नोकरी लागताच अनेक जण घरासाठी प्रयत्न करतात. मुंबई, पुण्यात जागेचे वाढते दर आणि गगनाला भिडलेल्या घराच्या किमतीमुळे अनेक जण लहान आकाराच्या बजेट होमला पसंती देतात, असे नुकतेच एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
एनारॉक रिसर्च कंपनीने जुलै ते डिसेंबर या महिन्यात ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. 14 शहरांत 22 ते 76 वयोगटातील 5510 जणांनी यात सहभाग घेतला होता. ई-मेल, वेब लिंक, मेसेज अशा माध्यमांतून त्यांनी आपली मते नोंदवली.
दिल्ली, बंगळुरूत प्रशस्त घरांना मागणी
मुंबई-पुण्यात एकीकडे छोटय़ा घरांना मागणी आहे, तर दुसरीकडे दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांत थ्री बीएचकेसारख्या प्रशस्त घरांना मागणी असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. या शहरातील 50 टक्के लोकांनी थ्री बीएचके फ्लॅट घेण्याची इच्छा दर्शवली आहे. याचे कारण मोठय़ा व्यक्तींनाच नाही तर घरातील लहान मुलांनादेखील स्वतंत्र रूम हवा आहे.





























































