भाईंदरमध्ये मिंध्यांविरोधात भाजपचा मोर्चा, प्रताप सरनाईक यांना घरचा रस्ता दाखवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदरमधील भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्या हॉटेलची तोडफोड मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या इशाऱयावरूनच झाल्याचा आरोप करीत आज हजारो भाजप कार्यकर्त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ‘अपने कुर्सी रिक्त करो, मीरा-भाईंदर को मुक्त करो’ अशा जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी आज काशिमिराचा परिसर दणाणून सोडला. आगामी निवडणुकीत प्रताप सरनाईक यांना पुन्हा तिकीट दिले तर खबरदार, त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा आवाजच भाजप कार्यकर्त्यांनी दिला.

चेन्ना या भागात भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांचे बीकेसी नावाचे हॉटेल असून सुशोभिकरणाचे काम करीत असताना एमएमआरडीएने या हॉटेलची एन्ट्रीच बंद करून टाकली आहे. तसेच हॉटेलच्या गेट जवळ तोडफोड केली. हे कारस्थान मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या इशाऱयावरूनच झाल्याचा जाहीर आरोप करत शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी सरनाईक यांच्याविरुद्ध भर रस्त्यामध्ये अर्धनग्न आंदोलन केले होते. हा माझा सरनाईकांविरोधात टाहो आहे, त्यांचे कधीही भले होणार नाही असे धापा टाकत शेट्टी सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर मीरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आज भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा व माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

तुम्हारी दादागिरी नही चलेगी
झंकार फॅक्टरी येथून निघालेल्या या मोर्चात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘तुम्हारी दादागिरी नही चलेगी, उस हरकत के पिछे काwन है?, क्यो पोलीस प्रशासन मौन है?’ असे फलक मोर्चामध्ये झळकत होते. दरम्यान, अरविंद शेट्टी यांच्या हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱयांवर देखील कारवाई करा अशी मागणी भाजपने केली. पालिका व एमएमआरडीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे असा सवालही करण्यात आला. आमच्या पदाधिकाऱयांना त्रास देणाऱया प्रताप सरनाईक यांना येत्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवणार असल्याचा इशाराही देण्यात आला. या मोर्चात भाजप युवा मोर्चाचे रणवीर वाजपेयी यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

एमएमआरडीएचे अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा
या मोर्चानंतर शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमएमआरडीएचे उपअभियंता प्रशांत वाकोडकर, श्रीजी ईपीसी कंपनीचे मालक भावेश शेठ व त्यांचे इंजिनिअर निहार प्रधान यांच्यावर काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.