मुख्यमंत्री महोदय, पोकळ वल्गना नको, कारखानदारांना पाठीशी घालू नका! शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपयांचा हप्ता तातडीने द्या, या मागणीसाठी ‘मुख्यमंत्री महोदय, पोकळ वल्गना नको, कारखानदारांना पाठीशी घालू नका!’ अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगाव-हातकणंगले रस्त्यावर काळे झेंडे दाखविण्यात आले.

राज्य सरकारने दोन महिन्यांत ऊस उत्पादक शेतकऱयांच्या खात्यावर 100 रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी करून पुणे-बंगळुरू महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते. जिह्यातील नऊ साखर कारखान्यांनी 100 रुपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत; पण राज्य सरकार ऊसदर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता देत नसल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे.

आतापर्यंत तीन महिने झाले तरी निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठीशी राहिल्याने संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ डिजिटल फलक तयार केले होते. ‘100 रुपयांचा दुसरा हप्ता बुडवून ‘एफआरपी’चे तुकडे करून शेतकऱयांच्या मुलांच्या हातात पेन नाही, दगड घ्यायला लावणारे सरकार’, ‘मुख्यमंत्री महोदय, पोकळ वल्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका’, ‘ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता 100 रुपये तातडीने द्या’ अशा आशयाचे फलक यावेळी दाखविण्यात आले.