स्मृतिग्रंथ- साहित्य जगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश काकर्णी

हंसा वाडकर जन्मशताब्दी होती तेव्हाची गोष्ट. तेव्हा त्यांचं आत्मकथन ‘सांगत्ये ऐका’चा उल्लेख केला जाणं अपरिहार्यच होतं. बाईच्या वाट्याला नाना भोग कसे आणि किती येतात, कधी त्याला जबाबदार ती असते तर कधी परिस्थिती, याचं नाट्यपूर्ण वर्णन करीत कसलाही आडपडदा न ठेवता हंसाबाईंनी आपल्या आयुष्याची गोष्ट सांगून टाकलेली आहे. यापूर्वी कुठल्याही अभिनेत्रीने आपल्या आयुष्याचा पंचनामा एवढा खुल्लमखुल्ला मांडलेला नव्हता. हंसाबाईंचं आयुष्य हे विलक्षण नाट्यमय आहे. त्यावर उत्कृष्ट नाटक होऊ शकतं असं मी म्हटलं होतं. पुढे कित्येक वर्षांनी हे कथानक घेऊन श्याम बेनेगल यांनी हिंदीमध्ये ‘भूमिका’ हा चित्रपट निर्माण केला. यात प्रमुख भूमिका स्मिता पाटीलने केली होती. हा चित्रपट गाजला होता.

बहुधा त्यानंतर हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर एक नाटकही आलेलं आठवत होतं. मात्र त्याचा उल्लेख कधीच कुठे आला नाही. हे सगळं आता पुन्हा एकदा आठवण्याचं कारण म्हणजे हल्लीच हंसाबाईंची ‘सांगत्ये ऐका’ ही कहाणी  (आविष्कार निर्मित, विश्वास सोहोनी रूपांतरित, दिग्दर्शित) याच नावाने मानसी कुलकर्णी यांनी एकपात्री प्रयोग सादर केला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘सांगत्ये ऐका’ या नाटकाची आठवण झाली. त्यासंबंधात प्रयत्न करूनसुद्धा माहिती मिळेना, पण योगायोगाने ही माहिती मिळाली. मीना गोखले-पानसरे संपादित, श्रीकला हट्टंगडी संयोजित आणि मनोरमा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेला ‘विनायक नावाचा भाऊ चासकर’ हा स्मृतिग्रंथ हाती आला. विनायक चासकर म्हणजे दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात ‘गजरा’, ‘नाट्यावलोकन’, ‘मुखवटे आणि चेहरे’ अशा दर्जेदार कार्पामांचा निर्माता. तेथून बाहेर पडल्यानंतर नाट्यसंपदाच्या ‘मला काही सांगायचंय’, ‘वीज म्हणाली धरतीला’ किंवा कमलाकर सारंग निर्मित, विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ यांसारख्या नाटकांचे नेपथ्य आणि प्रकाश योजना समर्थपणे करणारे नाट्यकर्मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी अनेक लेखकांना, नवोदित कलावंताला दिलेला मदतीचा हात हे त्यांचे ऋण न विसरता येण्यासारखे. तर अशा या स्मृतिग्रंथात ‘सांगत्ये ऐका’वरील नाटकाबाबत माहिती आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून विनायक चासकर आणि कुमुद चासकर हे पती-पत्नी बाहेर पडले. नाट्यप्रेम, अभ्यास आणि अनुभव या त्रिवेणीतून त्यांनी कौमुदी नावाची नाट्य संस्था स्थापन केली. ‘सांगत्ये ऐका’ वाचून कुमुद चासकर यांनी त्याचं नाट्य रूपांतर केलं ‘बावरे मी हरिणी!’

प्रमुख भूमिकेत भावना, हंसाच्या नवऱयाची भूमिका चित्तरंजन कोल्हटकर आणि विशेष भूमिकेत दत्ता भट. दिग्दर्शक हेमंत गुप्ते, नेपथ्य आणि प्रकाश योजना पांडुरंग कोठारी, पार्श्वसंगीत अरुण दाते यांचं होतं. पण पुण्यामुंबईत नाटक चाललं नाही. म्हणून मग उर्वरित महाराष्ट्राचा दौरा करण्यात आला. नंतर त्याची कोणाला आठवणदेखील राहिली नाही. पण विनायक चासकर स्मृतिग्रंथात या गोष्टीची नोंद आहे. विनायक चासकरांना त्यांचे टीव्हीवरील अनुभव, वेगवेगळ्या कलावंतांचे आलेले अनुभव, त्यांच्या कारकीर्दीबद्दल लिहावं, आठवणी सांगाव्यात असं वेळोवेळी त्यांच्या मित्रांनी, सुहृदांनी सांगितलं. त्यांनी कधी ते मनावर घेतलं नाही. थोडंफार लेखन झालं, पण नंतर त्यांचा मृत्यू झाला (17 मार्च 2021). मात्र विनायक चासकर आपले गुरू आहेत असं म्हणणाऱयांनी हे गुरुऋण फेडायचं म्हणून स्मृतिग्रंथाची योजना केली. त्यासाठी चासकरांचं मोठेपण ज्यांनी जाणलं होतं अशांकडून आठवणी लिहून घेतल्या. ज्यात याकूब सईदपासून दिलीप प्रभावळकरांपर्यंत, वीणा देवपासून मृदुला भाटकरांपर्यंत आणि सुरेश खऱयांपासून अरविंद औधेंपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे.

दिलीप प्रभावळकरांना दूरदर्शनवर नेलं रत्नाकर मतकरी यांनी. मात्र चासकरांनी त्यांच्या कलागुणांना भरपूर वाव दिला. अभिनयापासून ते लेखनापर्यंत. त्यामुळेच विजया जोगळेकर यांनी त्यांना ‘चिमणराव’ म्हणून निवडलं. पुढे प्रभावळकरांचं ‘चिमणरावाचा गजरा व इतर प्रहसने’ हा संग्रह निघाला. तो प्रभावळकरांनी विनायक चासकरांना अर्पण केला. अरविंद औंधे म्हणतात, ‘चेकमेट’ एकांकिका चासकरांनी दूरदर्शनवर केली आणि ही संधी माझ्यासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरली.’ अशोक हांडे म्हणतात, ‘प्रत्येकाला तुम्ही आपल्या कामातून, काम करण्याच्या पद्धतीतून आणि स्वभावातून शिकवलंत, नकळत शिकवलंत. तुम्ही म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतात.’ सुरेश खरे यांनी म्हटलंय, ‘चासकरांच्या अनेक कार्पामांना प्रचंड यश मिळालं. त्याला लोकप्रियताही मिळाली, पण ज्या स्तरावर त्यांची दखल घ्यायला हवी होती ती घेतली गेली नाही.’

कारणं काहीही असो, या स्मृतिग्रथांमुळे विनायक चासकरांच्या कामगिरीची थोडी तरी नोंद झाली… आणि अशासाठीच तर स्मृतिग्रंथ तयार करायचे असतात.