
लोकसभा निवडणुकीत बारामती डॅमेज केलं तर कल्याणमध्ये तुमचे बारा वाजवू, असा आवाज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दिला असतानाच आता भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही मिंध्यांना शिंगावर घेतले आहे. उठसूट आम्हाला डावलले तर याद राखा ठाण्यातील भाजप हतबल नाही. प्रत्येक वेळी अपमान कदापि सहन करणार नाही. तुम्हारे मूंह मे मोदी का नाम.. आणि ठाण्यात भाजप बेनाम असले दुटप्पी राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा केळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला आहे.
रायगड व बारामती मतदारसंघांवरून अजित पवार गट व मिंधे यांच्यात जुगलबंदी सुरू झाली आहे. त्यात आता ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही मिंध्यांना काटय़ावर घेतले. मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ठाणे शहरात सरकारचे व महानगरपालिकांचे अनेक उपक्रम राबवले जात असून उद्घाटने आणि भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना डावलल्याने ठाण्याचे आमदार संजय केळकर कमालीचे संतापले आहेत.
टीएमटीच्या वतीने आजपासून महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला आहे. या योजनेचा शुभारंभ आज मिंध्यांच्या बगलबच्च्यांनी परस्पर उरकला. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार संजय केळकर यांना साधे निमंत्रणही पाठवले नाही. त्यावरून ते कमालीचे संतप्त झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना केळकर यांनी मिंध्यांवर टीकेची जबरदस्त झोड उठवली. ते म्हणाले, बसमध्ये महिला व ज्येष्ठांना सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी आम्ही ही मागणी केली होती. तसेच पाठपुरावादेखील केला होता, पण भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले.
प्रत्येक वेळी एकतर्फी निर्णय आणि धोरण
ठाण्यात गेली 25 वर्षे आम्ही शिवसेनेबरोबर काम केले आहे. आता त्यांच्या एका गटाबरोबर एकत्र असलो तरी आम्हाला विचारात घेतले जात नाही. प्रत्येक वेळी एकतर्फी निर्णय आणि धोरण राबविले जाते. सहनशक्तीला काही मर्यादा असून भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता हा अपमान कधीही सहन करणार नाही. याबाबत जे राजकारण केले जात आहे ते बघता ‘मूंह मे मोदीजी का नाम.. और थाना मे बीजेपी बेनाम’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

























































