सत्याचा शोध- जेव्हा व्यथा सुरात बोलते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

>>चंद्रसेन टिळेकर

 

अत्रे कट्टा म्हणजे केवळ पारावरच्या शिळोप्याच्या मारलेल्या गप्पा नव्हेत तर ते सर्वसामान्य माणसावर होणाऱया अन्यायाविरुद्ध लढण्याचे रणांगण होऊ शकते, सामाजिक बहिष्काराचे हत्यार होऊ शकते, याचे प्रत्यंतर लवकरच मला आले. वाचन संस्कृतीला हातभार लावणाऱया कट्टय़ाची खरी ताकद कट्टय़ांवर झालेल्या प्रसंगातून अनुभवाला आली.

पार्ल्यात पहिला अत्रे कट्टा 9 मार्च 1996 साली सुरू झाल्याचे मी आधी नमूद केले होते. आमचा उत्साह वाढला होता. पुढच्या कट्टय़ाच्या वेळी रसिकांनी मला पारवजा सुरात सांगितले की, ‘हाईड पार्क’मधील ‘स्पीकर्स

कॉर्नर’मध्ये वक्त्यांना विषय दिलेला नसतो, परंतु इथे तुम्ही आधीच विषय दिला तर आम्हाला त्याचा अभ्यास करून बोलणे अधिक योग्य होईल. ही सूचना तशी योग्य होती, परंतु त्यामुळे बोलण्यातला उत्स्फूर्तपणा व विषयातला ताजेपणा नष्ट होण्याची भीती होती. पण सूचना पूर्णत चुकीची नव्हती. शेवटी कट्टय़ाचा दीड तासाचा अवधी दोन भागांत विभागायचे ठरले. पहिल्या पाऊण तासात बोलण्यासाठी कुठलाही विषय नसेल. वक्त्यांनी त्यांना डाचत असलेल्या कुठल्याही सामाजिक समस्यांवर, त्यांना आलेल्या कटू अनुभवांवर बोलावे. ज्यांच्याकडे जेव्हा काही विषय नसेल तेव्हा त्यांनी पाहिलेले उत्तम नाटक, चित्रपट, वाचलेले उत्तम पुस्तक, आवडलेली कविता किंवा एखादा विनोदही सांगावा. लोकांनी निरनिराळय़ा विषयांवर व्यक्त व्हावे हीच आमची इच्छा होती. कट्टय़ाच्या उरलेल्या पाऊण तासात मात्र आधी ठरलेल्या विषयावर बोलायचे असे ठरले.

मग आम्ही पुढच्या महिन्यातील विषय आधीच ठरवून ते पुठ्ठय़ांवर लिहून पार्ल्यात जिथे जागा मिळेल तिथे लटकवू लागलो. पण लोकमान्य सेवा संघ या संस्थेचे प्रवेशद्वार ही जागा मात्र कायमची ठरलेली होती. पहिल्या पाऊण तासात विषयाचे आणि आविष्काराचे कसलेही बंधन नसल्यामुळे मोठय़ा गमती घडू लागल्या. एक दिवस एक तरुण बोलायला उभा राहिला. तो म्हणाला, “इथे महिलांची उपस्थिती मोठी आहे. मी त्यांनाच तीन प्रश्न विचारणार आहे. त्याचे उत्तर महिलांनीच द्यायचे आहे. पुरुषांनी नाही.” त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो म्हणाला, “माझा पहिला प्रश्न असा आहे की, मुंबईच्या जोरदार पावसात पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त भिजतात. मग त्या पुरुषांच्या छत्रीपेक्षा लहान छत्री का वापरतात? दुसरा प्रश्न असा, एखाद्या लठ्ठ बाईचे मनगट किरकोळ पुरुषापेक्षा मोठे असूनही त्या टीचभरच आकाराचे घडय़ाळ का वापरतात? आणि मुंबईच्या दमट हवेत पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच जास्त घाम येतो. मग त्या पुरुषांच्या रुमालापेक्षा लहान आकाराचा रुमाल का वापरतात?

तीन प्रश्नांची ठिणगी टाकून तो खाली बसला. कट्टय़ावर सन्नाटा पसरला. पण एकेक करून महिला पदर खोचून पुढे आल्या. मोठी गमतीची उत्तरे ऐकायला मिळाली. कुणी म्हटले, “तुम्हा पुरुषांसारखी मोठी छत्री वापरली तर आम्ही भिजणार नाही आणि आम्ही भिजलो नाही तर, अंगे भिजली जलधाराने… असे नाटय़गीत तुम्हाला लिहिता येणार नाही. रसिकांनाही उत्तम नाटय़गीते ऐकायला मिळणार नाहीत. तेव्हा आमचे आभारच माना.” असे खडसावूनच त्या बाई खाली बसतात ना बसतात, तोच दुसरी महिला पुढे आली.  “आम्ही ऑफिस सुटल्यावर सरळ घरी येतो. तुम्हा पुरुषांसारखे गाठीभेटी, टेहळणी करीत भटकत नाही. त्यासाठी तुम्हाला सतत घडय़ाळाकडे पहावे लागते. म्हणून तुम्हाला मोठय़ा घडय़ाळाची गरज लागते. आम्हाला नाही, आम्ही फक्त ट्रेनची वेळ पाहण्यासाठी घडय़ाळ वापरतो व लहान घडय़ाळावर काम भागते!”

दोन प्रश्नांची अशी वासलात लागल्यावर तिसऱया प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी गार्गी नावाच्या बाई उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “आम्ही बायका तुम्हा पुरुषांसारखे येता-जाता नाक शिंकत नाही. तेव्हा लहान रुमाल आम्हाला पुरतो.” ही गमतीशीर सुंदोपसुंदी संपते न संपते तोच कट्टय़ाने एक हृदयंगम अनुभव घेतला. 80 वर्षांचे गोडबोले यांनी आपल्याला व्हायोलिन वाजवायचे आहे असे सांगितले. गोडबोले काकांनी त्यांच्या काळात अत्यंत गाजलेल्या आचार्य अत्रे निर्मित ‘ब्रम्हचारी’ चित्रपटातील ‘यमुना जळी खेळ खेळूया, कन्हैया का लाजता…’ हे गीत व्हायोलिनवर वाजवले. लोकांनी विशेषत: ज्येष्ठांनी टाळय़ांचा गजर केला. कारण त्यांना त्या गीताने त्यांच्या काळात नेले असावे. नंतर गोडबोले एकांतात जाऊन उदासपणे बसले होते. त्यांचे डोळे भरून आलेले दिसत होते. मी त्यांना म्हटले,  “दादा, तुम्ही उत्तम वाजवलंत, लोकांना खूप आवडलं.” तसे डोळे पुसून ते मला म्हणाले, “टिळेकर, माझ्या तरुणपणी मी व्हायोलिन वादनाचे जाहीर कार्पाम करायचो. प्रॅक्टिससाठी व्हायोलिन

वाजवलं तर नातवंडांना जुनी गाणी आवडत नाहीत आणि मला नवीन गाणी वाजवणं जमत नाही. त्यामुळे कितीतरी वर्षं हे व्हायोलिन अडगळीत पडलं होतं. आज त्यावरची धूळ झटकली गेली आणि या सुरांनी मला माझ्या गत आयुष्यात नेलं. माझं आयुष्य नक्कीच काही दिवसांनी वाढलं असणार.”

मला वाटते, एखाद्याला कुठल्याही प्रकारे व्यक्त होण्याची संधी मिळणे  महत्त्वाचे असते. पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाच्या वाचनालयाच्या मदतीने  उरलेल्या पाऊण तासात दिलेल्या विषयावर मंडळी बोलली. एक प्रकारे अत्रे कट्टा वाचन संस्कृतीला हातभारच लावीत होता. कट्टा म्हणजे केवळ पारावरच्या शिळोप्याच्या मारलेल्या गप्पा नव्हेत तर ते सर्वसामान्य माणसावर होणाऱया अन्यायाविरुद्ध लढण्याचे रणांगण होऊ शकते, सामाजिक बहिष्काराचे हत्यार होऊ शकते, याचे प्रत्यंतर लवकरच मला आले. त्याबद्दल बोलू पुढच्या वेळी.

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)